बुडालेल्या छोट्या व्यावसायिकांना मदत अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:10 AM2021-05-26T04:10:17+5:302021-05-26T04:10:17+5:30
अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसायांना लॉकडाऊनमध्ये पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. त्यामध्ये प्राधान्याने कापड व भांडी विक्रेते, बांगडी विक्रेते, ...
अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसायांना लॉकडाऊनमध्ये पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. त्यामध्ये प्राधान्याने कापड व भांडी विक्रेते, बांगडी विक्रेते, पानटपरीचालक, छोट्या टपऱ्यामधून व्यवसाय करणारे खाद्यपदार्थ विक्रेते, फर्निचर विक्रेते, मोबाईल दुरुस्ती व विक्री करणारे दुकानदार, स्टेशनरी व कटलरी व्यवसाय धारक, झेरॉक्स, बाईंडिंग, पेंटिंग व्यवसायधारक अशा अनेक छोट्या मोठ्या व्यावसायिकांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.
त्यातच ज्या कुटुंबावर कोरोना आजाराने घाला घातला त्यांची अवस्था आणखीनच बिकट झाली. व्यवसायासाठी पैसे नाहीत, त्यातच आजारपणात झालेले कर्ज यामुळे छोटे व्यापारी व्यावसायिक हतबल झाले आहेत. दुकानाचे भाडे, कुटुंबाची गुजराण, आजारपणाचा खर्च यासोबतच शाळांच्या फी संदर्भातील शासनाच्या संदिग्ध धोरणामुळे मुलांची शाळेचे फी भरण्याचे संकटदेखील त्यांच्यासमोर आहे.
या गंभीर परिस्थितीत ना कुणाची मदत न कुणाचे आर्थिक पाठबळ, छोटे व्यावसायिक आर्थिक अडचणींमुळे अत्यंत त्रासलेले आहेत. समाजातील या महत्त्वपूर्ण घटकाकडे देखील शासनाने लक्ष देण्याची गरज असून, अशा गरीब व गरजू छोट्या व्यावसायिकांसाठी अर्थसाहाय्याची योजना शासनाने मदत म्हणून जाहीर करावी, अशी मागणी या निमित्ताने होत आहे.