भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी महापालिका करणार २ कोटी ६६ लाखांचा खर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 06:10 PM2018-10-10T18:10:53+5:302018-10-10T18:26:33+5:30
शहरात भटकी व मोकाट कुत्र्यांचा उपद्रव प्रचंड वाढला आहे. त्यामुळे् या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिका तब्बल २ कोटी ६६ लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.
पुणे: शहरात भटकी व मोकाट कुत्र्यांचा उपद्रव प्रचंड वाढला आहे. त्यामुळे् या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिका तब्बल २ कोटी ६६ लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. यामध्ये नसंबदी शस्त्रक्रिया करणे, अँटी रेबीज लसीकरण करून या कुत्र्यांना बेल्ट, कॉलर आणि चिव लावून पकडलेली कुत्री पुन्हा त्याच जागेवर सोडण्यात येणार आहे. यासाठी खाजगी संस्थांना हे काम देण्यात आले अली असून, या संस्थेच्या कामांना मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
याबाबत स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी सांगितले की, पुणे शहरातील भटकी व मोकाट कुत्र्यांचे नसबंदी शस्त्रक्रियेसाठी एडब्ल्यूबीआय मान्यताप्राप्त संस्थांकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या. यामध्ये कुत्रे सुपूर्त करणे व नसबंदी शस्त्रकियेनंतर अँटी रेबीज लसीकरण करून बेल्ट,कॉलर,चिप लावून पकडलेल्या ठिकाणी कुत्रे सोडणे आदी कामांचा समावेश आहे. यासाठी ब्ल्यू क्रॉस सोसायटी आॅफ पुणे यांच्याकडून प्रतिश्वान १०३९ याप्रमाणे काम करून घेण्यास मान्यता देण्यात आली. २०२१ पर्यंत या संस्थेकडून हे काम करून घेण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक असणारे अॅप निर्माण करणे ते विकसित करणे यासाठी चार लाख ९० हजार रुपये तसेच शहरातील कुत्र्यांची गणना करण्यासाठी दोन लाख २५ हजार कामे करून घेण्यास मान्यता देण्यात आली.
पुणे मनपाने पकडलेल्या कुत्र्यांना अँटिरेबीज लसीकरण करून बेल्ट,कॉलर, चिप लावण्यासाठी प्रति श्वानाप्रमाणे संस्थेस अदा करण्यात येणार आहे. नसबंदी शस्त्रक्रिया झालेल्या कुत्र्यांना जागेवर अँटिरेबीज लसीकरण करून बेल्ट,चिप,कॉलर लावण्यासाठी प्रति श्वान १७० रुपये अदा करणे. नसबंदी झालेल्या कुत्र्यांना जागेवर अँटीरेबीज लसीकरण व कुत्र्याच्या मानेभोवती आर्थिक वर्षाप्रमाणे वेगवेगळ्या रंगाचे लसीकरण केल्याबद्दलचे बेल्ट,कॉलर,चिप लावणे यासाठी प्रति श्वान रुपये १९९ प्रमाणे संस्थेस अदा करण्यास मान्यता देण्यात आली.युनिव्हर्सल अॅनिमल वेलफेअर सोसायटीच्या प्रति श्वान १५९८ रुपये व अॅपसाठी चार लाख ९० हजार रुपये आणि कुत्र्यांची गणना करण्यासाठी ४ लाख ९० हजार रुपयांच्या रकमेला मान्यता देण्यात आली.
-----
शहरातील भटक्या व मोकाट कुत्र्यांच्या नसबंदी शस्त्रक्रिया करण्यासाठी युनिव्हर्सल अॅनिमल वेलअॅअर, बीड, ब्ल्यू क्रॉस सोसायटी आॅफ पुणे, अॅनिमल वेलफेअर असोसिएशन, नवी मुंबई आणि सोसायटी फॉर दि प्रिव्हेन्शन आॅफ कव्हएल्टी टू अॅनिमल्स, लातूर या चार संस्थांच्या निविदेला मान्यता देण्यात आली. यामध्ये ५६० रुपये प्रति श्वान आणि सीसीटीव्ही बसविण्यासाठी प्रत्येकी ७५ हजार रुपयांना मान्यता देण्यात आली. ब्ल्यू क्रॉस सोसायटी आॅफ पुणे ही संस्था मुंढवा केशवनगर या ठिकाणी आणि अन्य तीन संस्था नायडू पॉट येथे काम करणार आहेत. हा करार तीन वर्षांसाठी आहे.