पुणे महापालिकेच्या प्रॉपर्टीत दारूच्या बाटल्यांचा खच; सुरक्षारक्षकच मध्यरात्रीत करतात पार्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 07:04 PM2021-09-27T19:04:38+5:302021-09-27T19:49:42+5:30
सुरक्षा रक्षक मध्यरात्री तीन ते चार वाजेपर्यंत मद्याच्या पार्ट्या करतात. पार्ट्या करण्यासाठी सुरक्षा विभागाचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा सामील असल्याचा आरोप करण्यात आलाय.
पुणे : पुण्यात घोले रस्त्यावर महापालिकेचं मामाराव दाते मुद्रणालयात सर्हासपणे दारूच्या पार्ट्या झोडल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार कॅमेरात कैद झालाय. सुरक्षा रक्षक मध्यरात्री तीन ते चार वाजेपर्यंत मद्याच्या पार्ट्या करतात. पार्ट्या करण्यासाठी सुरक्षा विभागाचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा सामील असल्याचा आरोप करण्यात आलाय.
मामाराव दाते मुद्रणालयात दारूची पार्टी करतानाचा व्हिडिओ पुणे महापालिका प्रशासनाची झोप उडवणारा ठरलाय. विशेष म्हणजे हे मुद्रणालय महापौर बंगल्याजवळच आहे. महापालिकेच्या मालकीच्या या जागी दारूच्या बाटल्यांचा खच पडल्याचीही दृश्य बघायला मिळत आहेत. याचाच अर्थ कुणाचाही वचक इथल्या धुंद अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राहिलेला नाहीये. हा व्हिडिओ बाहेर आलाय म्हणून, नाहीतर या दारू पार्ट्या पुणे प्रशासनाला अंधारात ठेवून अशाच सुरू राहिल्या असत्या.
घोले रोडवर मामाराव दाते मुद्रणालय आहे. तिथे पुणे महापालिकेनं जुलै महिन्यात दुरुस्ती काम सुरू केलं. या मुद्रणालयाचा पूर्णविकास करण्यात येणार आहे. त्याला 'सिटी लायब्ररी' असं नाव देण्यात आलंय. ही राज्यातली सर्वात मोठी लायब्ररी असेल. पण आता दारू पार्त्यांनी या जागेची चर्चा होतेय. पुणे प्रशासन त्यांच्याच मुजोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या दारू पार्टीची काय भरपाई करायला लावेल याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे.
स्थानिक आमदार आणि नगरसेवक यांनी आता याप्रकरणी कटाक्षाने लक्ष घालण्याची गरज
तसंच इथल्या सांस्कृतिक भवनातल्या काही वस्तू चोरीला गेल्याचं समोर येतंय. सांस्कृतिक भवनातले सुरक्षा रक्षक ओंकार गुरूड हे गुरुवारी तेवीस तारखेला पंडित जवाहरलाल नेहरू आर्ट गॅलरी इथं रात्रपाळीत सुरक्षा बजावत होते. तेव्हा सांस्कृतिक भवनातली हातगाडी, पाणीपुरी गाडी चोरून नेणाऱ्या चोरांना पकडताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला त्या चोरांनी केला. या चोरीच्या घटनेनंतर शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये दोन अज्ञातांविरोधात गुरुड यांनी तक्रार दाखल केली. पुणे पालिका प्रशासनाने तसंच स्थानिक आमदार आणि नगरसेवक यांनी आता याप्रकरणी कटाक्षाने लक्ष घालण्याची गरज आहे.