योजनांचा खर्च किरकोळ कारणांसाठी, गुळुंचे ग्रामपंचायतीचा पराक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 02:02 AM2018-09-26T02:02:35+5:302018-09-26T02:02:47+5:30
गुळुंचे (ता. पुरंदर) ग्रामपंचायतीच्या मागील सदस्य मंडळ व ग्रामसेवक यांनी अंगणवाडी, स्मशानभूमी, व्यायामशाळा या मूलभूत विकासकामांसाठी विविध शासकीय योजनांतून आलेला पैसा किरकोळीत खर्च करण्याचा पराक्रम केला आहे.
सोमेश्वरनगर : गुळुंचे (ता. पुरंदर) ग्रामपंचायतीच्या मागील सदस्य मंडळ व ग्रामसेवक यांनी अंगणवाडी, स्मशानभूमी, व्यायामशाळा या मूलभूत विकासकामांसाठी विविध शासकीय योजनांतून आलेला पैसा किरकोळीत खर्च करण्याचा पराक्रम केला आहे. यामुळे मागील दोन-तीन वर्षांत अंगणवाडी, व्यायामशाळा या सुविधांपासून नागरिक वंचित आहेत तर स्मशानभूमी अपूर्ण अवस्थेत आहे. मोठ्या कामांची प्रमाणके, अंदाजपत्रके, मूल्यांकनेदेखील गायब आहेत.
माजी केंद्रीय कृषिमंत्री यांच्या प्रयत्नााने माजी खासदार गांगुली यांनी आदर्श सांसद ग्राम योजनेत गुळुंचे गाव दत्तक घेतले होते. यामुले गावाला विविध मार्गांनी निधीही प्राप्त झाला. पण तत्कालीन कारभारी सदर निधीचा योग्य विनियोग करण्यात आपयशी ठरले. गुळुंचेत डिसेंबर २०१७ ला सत्तांतर झाले. नव्या कारभाऱ्यांनी लेखापरीक्षणाचा आग्रह धरताच ग्रामसेवक पुंडलिक म्हस्केंनी असहकार पुकारत दफ्तर गायब केले. ग्रामस्थांच्या मागणीनुसार गटविकास अधिकाºयांनी ३१ मार्च २०१८ रोजी ग्रामपंचायतीच्या चौकशीचे आदेश दिले. वारंवार पाठपुराव्यानंतर ग्रामसेवकाने २२ मे रोजी दिले.
अंगणवाडीसाठी जिल्हा योजनेतून ३१ मार्च २०१७ अखेर ४ लाख ९९ हजार निधी ग्रामपंचायत खात्यावर जमा झाला. तर व्यायामशाळेला जिल्हा क्रीडा निधीतून ४ आॅगस्ट २०१७ रोजी पाच लाख मिळाले. दोन्ही कामांची निविदाप्रक्रियाही पार पडली .मात्र ,ठेकेदारांना कार्यारंभ आदेशच दिला नाही. उलटपक्षी सर्व पैसा वेतन, मुरूमीकरण, इलेक्ट्रीकल सादील, पाणीपुरवठा, वीजबिल, परिसर सुधारणांवर उधळला. अंगणवाडी व व्यायामशाळा योजना बारगळल्या. अहवालानुसार ही गंभीर आर्थिक अनियमितता ठरली आहे. स्मशानभूमीसाठी प्राप्त झालेल्या ५ लाख ३० हजारांपैकी ठेकेदारास ३ लाख ९९ हजार दिले. उर्वरीत १ लाख ३० हजार ठेकेदारास देय असतानाही टीसीएल, मानधन, मुरूमीकरण, झाडे काढणे यावर खर्च केला आहे. स्मशानभूमी मात्र अपूर्णच असणे गंभीर आहे.
ज्योतिर्लिंग विद्यालयातील मुलींच्या शौचालयासाठी खासदार निधीतून २ लाख ६८ हजार मंजूर झाले आहेत. ग्रामपंचायतीने काम पूर्ण करून तो निधी घ्यायचा आहे. ग्रामपंचायतीने १ लाख ८५ हजार खर्च केले पण काम अपूर्ण ठेवले. १४ व्या वित्त आयोगातून २०१६-१७ वर्षात ग्रामपंचायत कार्यालय, सौर दिवे, इमारत दुरूस्तीसाठी ४ लाख १७ हजार वापरले. २०१७-१८ वर्षात महिला बालकल्याण, जलशुध्दीकरण यंत्र, बौध्दविहार व लक्ष्मीमाता सुधारणा, नागोबा मंदिर सुधारणा, बल्ब, आपले सरकार केंद्र यासाठी ९ लाख ४८ हजार खर्च केले.
दोन्ही वर्षांतील खर्चाची प्रमाणके उपलब्ध नाहीत
दोन्ही वर्षांतील खर्चाची प्रमाणके, अंदाजपत्रके, मूल्यांकन उपलब्ध नाही. ही बाब तात्पुरता संशयित अपहार म्हणून नोंदविण्यात आली आहे. १ लाख ६४ हजारांचे रस्ता मुरूमीकरण बेकादेशीरपणे केले आहे. घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचे रजिस्टर अधिकाºयांकडून साक्षांकित केले नाही. ग्रामसेवकाने रकमा बँकेत न भरता मोठ्या प्रमाणात रोखीने शिल्लक ठेवल्या. त्यातून १ लाख ५२ हजारांचा परस्पर खर्च तात्पुरता अपहार मानला आहे.