खर्च दोन लाख अन् तोटा ५० हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:10 AM2021-05-26T04:10:21+5:302021-05-26T04:10:21+5:30
- लॉकडाऊनमुळे मागणी घटल्याचा परिणाम पुणे : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केलेले लॉकडाऊन, व्यापारावरील निर्बंध आणि मागणी नसल्याने कलिंगड उत्पादक ...
- लॉकडाऊनमुळे मागणी घटल्याचा परिणाम
पुणे : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केलेले लॉकडाऊन, व्यापारावरील निर्बंध आणि मागणी नसल्याने कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने कलिंगड विक्री करावी लागत आहे. यंदाच्या हंगामात प्रत्येक शेतकऱ्याला एकरामागे किमान २० ते ५० हजारांचा तोटा सहन करावा लागला आहे.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, इंदापूर, दौंड आणि बारामती या तालुक्यांत यंदा अंदाजे दोन ते अडीच हजार एकर क्षेत्रावर कलिंगड लागवड करण्यात आली. एकरी सरासरी २० ते २५ टन उत्पादन मिळाले. मात्र, लॉकडाऊनमुळे खरेदी नसल्याने त्याचा फटका शेतकऱ्याला बसला. आंबेगाव तालुक्यातील काटापूर बुद्रुकचे शेतकरी गणेश पवार यांनी अडीच एकर क्षेत्रावर कलिंगड लागवड केली होती. लागवड, मजुरी, खते, वाहतूक खर्च असा एकूण २.२५ लाख रुपये खर्च त्यांनी केला. ते म्हणाले की, यंदा ८० टन उत्पादन मिळाले. कलिंगडाचा आकार मोठा असल्याने आठ रुपये प्रतिकिलो दर मिळावा अशी अपेक्षा होती. मात्र, प्रतिकिलो केवळ चार रुपये भाव मिळाला. त्यामुळे सर्व फळांच्या विक्रीतून फक्त दोन लाख रुपये मिळाले. कोरोनामुळे यंदा २५ हजार रुपयांचा तोटा झाला आहे. आता लागवडीसाठी घेतलेल्या कर्जाऊ रकमेची परतफेड कशी करायची असा प्रश्न आहे.
मार्केट यार्डमधील फळविक्रेते अरविंद मोरे म्हणाले की, कलिंगडाला यंदा किलोच्या दराने चार ते आठ रुपये दर मिळत आहे. लॉकडाऊन, व्यापारावरील मर्यादा यांमुळे उत्पादन चांगले होऊनही कलिंगड उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. तसेच, त्यांच्यावर अवलंबून असलेले हातगाडीवाले, फेरीवाले यांचेही नुकसान झाले आहे.
शहरात २० रुपये किलो
कलिंगडाला बाजारभाव चार रुपये किलो असला तरी पुणे शहरात व्यापाऱ्यांकडून १५ ते २० रुपये किलो दरानेच विक्री केली जात आहे. बाजारभाव माहिती नसल्याने ग्राहकही जादा दराने खरेदी करत आहेत.
चौकट -
पुणे जिल्ह्यातील कलिंगडाचे क्षेत्र - अंदाजे २ ते २.५ हजार एकर
प्रति एकर सरासरी उत्पादन - २५ टन
यंदा मिळालेला भाव - चार रुपये किलो
यापूर्वी मिळालेला सर्वाधिक भाव - १५ रुपये किलो
कोट -
कलिंगडाला बाजारात प्रतिकिलो केवळ तीन ते चार रुपये किलो भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा तोटा सहन करावा लागत आहे. यापूर्वी अशी परिस्थिती कधीही आली नव्हती. २०१९ मध्ये कलिंगडाला प्रतिकिलो सर्वाधिक १५ रुपये दर मिळाला होती. यंदा शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे.
- सतीश वैरागकर, फळे विक्री व्यापारी
कलिंगडाला भाव नसल्याने शेतकºयाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर विक्रेते, व्यापारी यांनाही फटका बसला आहे. माल बाजारात पाठवू नका असे सांगण्याची वेळ आली आहे.
- गोरक्ष हजारे, फळविक्रेते
चौकट -
नुकसानीची कारणे
लॉकडाऊन, विक्रीवरील निर्बंध, अवकाळी पाऊस, ढगाळ हवामानाचा फटका यंदा कलिंगडाला बसला. तसेच, छोट्या विक्रेत्यांना परवानगी नसल्याने मागणी कमी झाली. त्यामुळे शेतकऱ्याला नाईलाजाने चार रुपये किलो दराने कलिंगड विकावे लागले.
फोटो - कलिंगड १, कलिंगड २