Tanaji Sawant: सरकारी यंत्रणेचा खर्च सावंतांकडून वसूल करावा; पुण्यात राजकीय पक्षांकडून टीकेचा भडिमार
By राजू इनामदार | Updated: February 11, 2025 18:22 IST2025-02-11T18:21:40+5:302025-02-11T18:22:22+5:30
अनेक बेपत्ता होणाऱ्या मुलांचा तपास होत नाही, मात्र सावंत प्रकरणात पोलिसांनी दाखवलेली चपळाई आश्चर्यकारक आहे

Tanaji Sawant: सरकारी यंत्रणेचा खर्च सावंतांकडून वसूल करावा; पुण्यात राजकीय पक्षांकडून टीकेचा भडिमार
पुणे : कुटुंबातील भांडणावरून न सांगता परदेशात चाललेल्या मुलासाठी माजी मंत्री तानाजी सावंत यांनी सगळी सरकारी यंत्रणा कामाला लावली. या यंत्रणेसाठी झालेला सगळा खर्च त्यांच्याकडून वसूल करावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख संजय मोरे यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे राज्य प्रवक्ता सुनील माने यांनी सावंतांवर सरकारची दिशाभूल केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. अन्य राजकीय पक्षांकडूनची सावंत यांच्यावर टीका होत आहे.
सावंत यांचा धाकटा मुलगा घरी न सांगता खासगी विमान घेऊन थेट बँकॉकला निघाला होता. त्यावरून सावंत यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करून मदत मागितली. मुलाचे अपहरण झाल्याची अफवा तोपर्यंत सगळीकडे पसरली. सरकारी यंत्रणेला वरिष्ठांचे आदेश मिळाल्याने त्यांनी त्वरेने बऱ्याच हालचाली केल्या. त्यात तो मुलगा खासगी विमानाने बँकॉकला चालला असल्याचे लक्षात आले. त्यानंतर बऱ्याच कायदेशीर गोष्टी करून पोलिसांनी ते विमान परत पुण्यात आणले.
सावंत चांगले सुशिक्षित आहेत. मंत्री होते. अशा व्यक्तीला कुटुंबाचे, कुटुंबातील गोष्टींचे थोडे तरी भान असले पाहिजे, असे मत माने यांनी व्यक्त केले. देशात अनेक मुले बेपत्ता होतात, घरांतून निघून जातात, त्यांची साधी पोलिस फिर्यादही घेतली जात नाही. तपास होत नाही. वर्षानुवर्षे ही मुले बेपत्ताच राहतात. सावंत प्रकरणात मात्र पोलिसांनी दाखवलेली चपळाई आश्चर्य करण्यासारखी आहे. त्यामुळे हे सरकार सामान्यांसाठी आहे की फक्त पुढारी, राजकारण्यांसाठी, असा प्रश्न पडला असल्याचे माने म्हणाले.
संजय मोरे यांनीही सावंत यांच्यावर टीका केली. घरच्या भांडणांसाठी सरकारला कामाला लावणाऱ्या सावंत यांच्यावर कारवाई व्हायला हवी, त्यांच्या मुलांसाठी झालेला सरकारचा सगळा खर्च त्यांच्याकडून वसूल करावा, अशी मागणी त्यांनी केली. सामान्यांच्या मुलाबाळांनाही सरकारने अशीच वागणूक द्यावी, त्यांच्यासाठीही अशीच त्वरित हालचाल करावी असे ते म्हणाले.
आम आदमी पक्षाचे प्रवक्ते मुकुंद किर्दत म्हणाले, जनतेने पॅनिक बटण दाबले तर साधा पोलिस शिपाईसुद्धा कधी येत नाही. निर्घृण हत्या झालेले सरपंच संतोष देशमुख यांचा खुनी दोन महिने झाले तरी पोलिसांना सापडत नाही. इथे मात्र माजी मंत्र्यांच्या घरातून फक्त न सांगता गेलेल्या मुलासाठी मुख्यमंत्र्यांपासून ते पोलिस महासंचालकांपर्यंत सगळे कामाला लागतात. लोकशाही व्यवस्थेची यासारखी दुसरी चेष्टा नाही, असे किर्दत म्हणाले.
समाजमाध्यमांवरही तानाजी सावंत अनेकांच्या टीकेचे धनी झाले आहेत. खेकड्यांनी धरणाची भिंत कुरतडली म्हणून ती कोसळली असा विनोदी शोध लावणारे, तो कोण हाफकिन आहे, त्याला बोलावून घ्या, असे म्हणणारे हेच ते महान माजी मंत्री वगैरे टीका सावंत यांच्यावर सुरू आहे. मुलांना सांभाळता येत नाही ते सरकार कसे सांभाळणार? असाही प्रश्न विचारला जात आहे.