अवैध धंद्यांवर कारवाईत चालढकल करणे पडले महागात ; वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह ६ जणांना दणका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 06:05 PM2020-09-03T18:05:39+5:302020-09-03T18:12:01+5:30
पोलीस अधिकाऱ्यांना कर्तव्यातला निष्काळजीपणा भोवला..
पुणे : वरिष्ठांच्या आदेशाचे उल्लंघन करुन अवैध धंद्यांवर कारवाई करण्यास कसूर केल्याबद्दल येरवडा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, निरीक्षक, सहायक निरीक्षक आणि ३ कर्मचाऱ्यांवर पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.या ६ जणांची दोन वर्षांसाठी वेतनवाढ स्थगित करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख, निरीक्षक अजय भीमराव वाघमारे, सहायक निरीक्षक राहुल गिरमकर, पोलीस नाईक अ.सा.गवळी, कि. ज. सांगळे, राजू बहिरट अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत.
पोलीस उपायुक्त परिमंडळ ४ यांनी अवैध धंद्यांवर कारवाईचे आदेश दिले होते़ करण घमडे (वय ३०, रा.भाटनगर, येरवडा) हा दारुची विक्री करत असताना कोरोनाचा संसर्ग होऊन त्यात त्यांचा मृत्यु झाला.यावरुन असे निष्पन्न होते की, या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात अवैध मटका व जुगार, अवैध दारु विक्री चालू होती. चौकशीत अवैध धंदेवाल्यांचे मोबाईल नंबरांची पडताळणी केली असता त्यात अवैध धंदेवाल्याशी पोलीस कर्मचाऱ्यांचा संपर्क असल्याचे आढळून आले. सहायक निरीक्षक, निरीक्षक आणि वरिष्ठ निरीक्षक यांचे कर्मचाऱ्यांवर प्रभावी पर्यवेक्षणाचा अभाव असल्याचे स्पष्ट होत आहे.जनमानसात पोलिसांची प्रतिमा मलीन होण्यास कारणीभूत ठरल्याने त्यांची दोन वर्षे वेतनवाढ रोखण्याचा आदेश पोलीस आयुक्त डॉ के. व्यंकटेशम यांनी दिला आहे.