महागडी वीजखरेदी महावितरणला परवडेना
By admin | Published: May 8, 2017 01:57 AM2017-05-08T01:57:29+5:302017-05-08T01:57:29+5:30
कोयना धरणातील पाण्याचा महाराष्ट्राचा निर्धारित कोटा संपल्याने या केंद्रातील वीजनिर्मितीला फटका बसला आहे. महागडी खासगी
लोकमत न्यूज नेटवर्क
सोमेश्वरनगर : कोयना धरणातील पाण्याचा महाराष्ट्राचा निर्धारित कोटा संपल्याने या केंद्रातील वीजनिर्मितीला फटका बसला आहे. महागडी खासगी वीजखरेदी (एक्स्चेंजमधील) आर्थिक चणचणीमुळे महावितरणने थांबविली आहे.
सुमारे ४ हजार मेगावॉट भारनियमनाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. जलयुक्त शिवारच्या कामांमुळे आणि चांगल्या पावसामुळे पाणी आहे; पण वीज नाही, या परिस्थितीला तोंड देण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे. पाणी लवादाच्या वाटपानुसार कोयना धरणातून महाराष्ट्राच्या वाट्याला ६७ टीएमसी इतके पाणी आहे. गेल्या काही महिन्यांत योग्य नियोजन राखले न गेल्याने या पाण्याचा वीजनिर्मितीसाठी भरमसाट वापर करण्यात आला आणि उन्हाळ्यासाठी राखीव ठेवण्याचे नियोजन करण्यात आले नाही. राज्याच्या हिश्शाचे पाणी संपल्याने कोयना प्रकल्पातून साधारणपणे मिळणारी एक हजार मेगावॉट वीज कमी झाली आहे. कोयनेचा टप्पा ४ तर कधीच बंद झाला होता.
आता पहिल्या टप्प्यातील वीजनिर्मितीही थंडावली आहे. देशातच सध्या उन्हाळ्यामुळे विजेची मागणी कमालीची वाढली असून, पुरवठा कमी झाला आहे. वीजनिर्मिती संच बंद पडत आहेत. गुजरातमध्ये दोन हजार मेगावॉट विजेचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे खासगी वीजखरेदी प्रक्रियेद्वारे (एक्सेंजच्या माध्यमातून) मिळणारी वीज महाग होत चालली आहे.
काही महिन्यांपूर्वी पावणेतीन रुपये प्रतियुनिट असलेला विजेचा दर पाच ते साडेपाच रुपये प्रतियुनिटवर गेला आहे. महावितरणकडे पुरेशी वीज उपलब्ध असल्याने खासगी वीजखरेदीची गरज फारशी भासत नव्हती आणि आर्थिक चणचणीमुळे महागडी वीजखरेदी करायची नाही, असे महावितरणने ठरविले आहे. महागडी वीजखरेदी केल्यास दर महिन्याला साधारणपणे ५०० कोटी रुपयांचा आर्थिक भार सहन करावा लागतो. हा भार घेऊन कृषीपंपांसाठी वीज पुरविणे हा आतबट्ट्याचा व्यवहार ठरत आहे. सुमारे ८५ ते ९० टक्के शेतकरी कृषीपंपांचे वीजबिलही भरत नाहीत. परिणामी, आर्थिक डबघाईला आलेल्या महावितरणने सध्या महागडी वीजखरेदी जवळपास थांबविली आहे.
या परिस्थितीत संच बंद पडल्याचा आणि विजेची मागणी वाढल्याचा फटका बसला आहे. अघोषित भारनियमन करण्यात येत आहे. त्यासाठी कोणतेही विभागनिहाय वेळापत्रक तयार करण्यात आलेले नसून, सर्व विभागात सूत्र न ठरविता भारनियमन सुरू असल्याने गोंधळ आहे. निवासी व अन्य ग्राहकांना अधिक वीजपुरवठा करण्यात येणार असून, कृषीपंपांना फारशी वीज उपलब्ध होणार नाही. त्यामुळे यंदा पाणी उपलब्ध असूनही शेतकऱ्यांना वीज नसल्याने फटका बसणार आहे.