खते पेट्रोलच्या दरवाढीने महागली शेतीही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:13 AM2021-03-10T04:13:07+5:302021-03-10T04:13:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या खतांच्या किमतीत व पेट्रोल, डिझेलच्या दरातही वाढ झाल्याने शेती महागली आहे. या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या खतांच्या किमतीत व पेट्रोल, डिझेलच्या दरातही वाढ झाल्याने शेती महागली आहे. या दोन्ही गोष्टी केंद्र सरकारवर अवलंबून असल्याने शेतकऱ्यांमध्ये सरकारवर वाढता रोष दिसून येत आहे.
खरीप हंगामाची पेरणी तोंडावर आलेली असताना ही वाढ झाली आहे. पेरणीपूर्व मशागतीमध्ये जमिनीला खतांची मात्रा द्यावी लागते. ही खते नत्र, स्फुरद व पालांश ( नायट्रोजन, फॉस्परस व पोटॅश, एनपीके) युक्त असतात. त्यांची एक बॅग ५० किलोची असते. एका बॅगमागे १०० ते १५० रूपये वाढले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. एका एकरमध्ये साधारण ४ ते ५ बॅगा टाकाव्या लागतात. हा पहिला डोस असतो. किंमत वाढल्याने आता ४ किंवा ५ बँगामागे ६०० ते ७५० रूपये जास्तीचे द्यावे लागतील. दुसऱ्या डोससाठीही तेवढेच पैसे जास्तीचे जातील.
बहुसंख्य ठिकाणी शेतीची नांगरणी वगैरे कामे आता ट्रॅक्टरनेच होतात. त्यासाठी एका तासाला साधारण ५०० रूपये घेतला जात होते. आता डिझेलचे दर वाढल्याने थेट ८०० रूपये असा दर झाला आहे. त्याशिवाय शेणखत आणण्यासाठी, शेतमाल नेण्यासाठी म्हणून ट्रॅक्टरची ट्रॉली लागते. या ट्रॉलीसाठी तीन ते चार किलोमीटरच्या एका ट्रीपला ३०० रूपये घेत असत. आता तो दर थेट ४५० ते ५०० असा झाला आहे असे शेतकºयांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागात खतांच्या किमतीविषयी चौकशी केली असता तिथून खतांचे भाव केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय वाढवता येत नाहीत असे स्पष्ट करण्यात आले. कोणतीही कंपनी खताचे भाव स्वत: ठरवत नाहीत. त्यासाठी केंद्राची एक समिती आहे. त्या समितीकडे दरांचा तक्ता द्यावा लागतो. त्यांच्या मंजूरीनंतरच दरवाढ होते अशी माहिती देण्यात आली.
---------------
जिल्ह्याची खरीपासाठीची खतांची मागणी-- दोन लाख टन
सध्याचा खतांचा शिल्लक साठा-- ८० हजार टन
दरमहाची आवक-- १० ते १५ हजार टन.
खतांचा बॅगमागे वाढलेला दर- १०० ते १५० रूपये.
आधीची ५० किलोची किंमत- ११०० रूपये
आता ५० किलोची किंमत- १३०० रूपये