आयोध्येतील श्रीराम मंदिराची अनुभूती; दगडूशेठ गणपती मंडळ देखावा नागरिकांचा केंद्रबिंदू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2023 09:03 AM2023-09-20T09:03:31+5:302023-09-20T09:08:22+5:30
मंदिराचे लाल पाषाण शिळानी उभारलेले नक्षीदार खांब आणि कलाकुसर केलेला गाभारा आणि त्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीची सर्वांग सुंदर मूर्तीचे दर्शन घेत भक्त आयोध्या येथील श्रीराम मंदिराची अनुभूती घेत होते....
पुणे : शिवाजी रस्त्यावर दुरवरून दिसणारा भव्य मंदिरांचा कळस.. त्यावर श्रीरामाचा पूर्णाकृती पुतळा आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूस रामायणातील विविध प्रसंगातील चित्र पाहून भव्य मंदिर पाहण्याचे कुतूहल निर्माण होते. मंदिराचे लाल पाषाण शिळानी उभारलेले नक्षीदार खांब आणि कलाकुसर केलेला गाभारा आणि त्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीची सर्वांग सुंदर मूर्तीचे दर्शन घेत भक्त आयोध्या येथील श्रीराम मंदिराची अनुभूती घेत होते.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्यावतीने यंदा श्रीराम मंदिराचा देखावा साकारला असून गणेशभक्तांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असून पहिल्या दिवसापासून गर्दी दिसून येत आहे. शिवाजी रस्त्यावर आप्पा बळवंत चौकातूनच श्री राम मंदिराचा कळस दृष्टीस पाडतो आणि मंदिर कसे असेल? याचे मनात कुतूहल निर्माण होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेल्या खांबाच्या कमानीवर रामायणातील विविध प्रसंग चितारले आहेत. त्यात राम जानकी विवाह, लक्ष्मण शूर्पनखाचे नाक कापतानाचे, वनवासातील काळ, शबरीचे उष्टे बोरे खात असताना राम, सीतेचे अपहरण, जटायू, वानरसेना रामसेतू बांधतानाचे दृश्य, कुंभकर्ण, रावणाचा वध आदी चित्रं आपल्या नजरेस पडतात. ते पाहत आपण मंदिराकडे मार्गक्रमण करतो.
लाल पाषाणातील शिळानी मंदिराची उभारणी केली असल्याचा आयोध्या येथे उभारण्यात येत असलेल्या श्रीराम मंदिराचा देखावा उभा केला आहे. मंदिरावर धनुष्यबाण घेतलेल्या पूर्णाकृती रामाच्या पुतळ्याचे दर्शन होते. मंदिराचे खांबावर आणि मुख्य गाभाऱ्यात अप्रतिम कलाकुसर आणि नक्षीकाम केले आहे. रांगेत उभा असताना दुरून नागरिक भव्य राम मंदिर आणि गाभाऱ्यातील दगडूशेठ गणपतीचा फोटो कॅमेऱ्यात टिपून घेत होते.
गणपती प्राणप्रतिष्ठापणा गणेश चतुर्थीनिमित्त सुटी असल्याने पहिल्याच दिवशी गर्दीचा महापूर आला होता. पुण्याच्या आसपासच्या उपनगरातून नागरिक मोठ्या संख्येने गणेश मंडळाचे देखावे पाहण्यासाठी आले होते. मध्यवर्ती भागातील अनेक गणेश मंडळांनी पहिल्या दिवसापासून देखावे सादरीकरण सुरू केले होते. मुख्य गाभाऱ्यात दगडूशेठ गणपतीची मूर्ती विराजमान आहे. गाभाऱ्यात छताला अप्रतिम कलाकुसर केली आहे. श्रीकृष्णाचे विविध अवतार वामन, परशुराम, नृसिंह आदी शिल्पे आहेत.