मृतदेहांच्या जगात वावरणारी ‘जिवंत माणसं’! स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे अनुभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:14 AM2021-03-09T04:14:43+5:302021-03-09T13:38:29+5:30

नेहा सराफ -  पुणे : महाराष्ट्रात गेल्या वर्षी ९ मार्चला आलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नाही. मार्चपासून पुढे दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत ...

The experience of the staff working in the 'living man' cemetery in the world of corpses | मृतदेहांच्या जगात वावरणारी ‘जिवंत माणसं’! स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे अनुभव

मृतदेहांच्या जगात वावरणारी ‘जिवंत माणसं’! स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे अनुभव

googlenewsNext

नेहा सराफ - 

पुणे : महाराष्ट्रात गेल्या वर्षी ९ मार्चला आलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नाही. मार्चपासून पुढे दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत होती. लॉकडाऊनने तर हसती, खेळती गावं, शहरं अक्षरशः ओस पडली. जवळपास प्रत्येकाने प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे कोरोना अनुभवला. पण यातही थेट अनुभव घेणाऱ्यांपैकी एक होते, स्मशानभूमीत काम करणारे कर्मचारी. आज एक वर्षानंतर या कर्मचाऱ्यांचे अनुभव अंगावर काटा आणणारे ठरलेत.

पुण्याच्या कैलास स्मशानभूमीत जवळपास ४ हजार कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. इथे तीन शिफ्टमध्ये कर्मचारी काम करत होते. कोरोनाआधी इथे महिन्याला १२० ते १५० व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यात येत होते. कोरोना काळात प्रतिदिन ४० व्यक्तींपर्यंत ही संख्या गेली होती. अक्षरशः दोन्ही विद्युत दाहिनी २४ तास सुरु असताना शवपेटीत १० आणि बाहेर अ‍ॅम्ब्युलन्समध्ये बाकीचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी प्रतीक्षेत असायचे. बाहेर रस्त्यांवर चिटपाखरू नाही, स्मशानात फक्त अ‍ॅम्ब्युलन्स चालक मृतदेह ठेऊन जायचे, बाजूला ना नातेवाईक ना मित्रपरिवार. इथले ऑपरेटर ललित जाधव म्हणतात, 'सुरुवातीला मला घरी जायचीही भीती वाटायची. आजुबाजुचेही लोक मुलगा स्मशानभूमीत काम करतो म्हणून घरच्यांकडे नाराजी व्यक्त करायचे. मी तर सकाळी सगळे उठण्याआधी स्मशानभूमीत यायचो आणि रात्री उशिरा परतायचो. वर्षानुवर्षे रोज भेटणारे मित्रही या काळात भेटले नाहीत'. दुसरे ऑपरेटर किशोर क्षीरसागर म्हणतात, 'मला तर शेजाऱ्यांनी गल्लीत राहण्यास बंदी घातली. अखेर मी ८ वर्षांच्या मुलासोबत येरवडा स्मशानभूमीत राहायचो. या काळात स्वतः जेवण बनवायचो. ते दिवस आठवले तरी अंगाची थरथर होते'.

---------------

पाया पडतो पण चेहरा बघू द्या

अनेकदा आज वडिलांचा, उद्या आईचा असे रांगेत एकाच कुटुंबियातले मृतदेह अंत्यसंस्कारांसाठी आले होते. रडणारे नातेवाईक बघून अंतःकरण भरून यायचं पण काम करणं भाग असायचं. नातेवाईक असतील तर चेहरा बघण्यासाठी अक्षरशः पाया पडायचे पण नियमापुढे आम्हीही हतबल होतो. आई वडिलांच्या अस्थी आणताना आता मृत्यूचा दर कमी झालाय आणि लोकांची भीतीही. त्यामुळे आम्हीही निर्धास्तपणे काम करू शकतो.

---------------------

एकही कर्मचारी कोरोनाग्रस्त नाही

सुदैवाने इथे काम करणारा एकही कर्मचारी वर्षभरात कोरोनाबाधित झाला नाही.यासाठी महापालिकेने पीपीई किट उपलब्ध करून दिले होतेच पण तीव्र इच्छशक्ती आणि काम करताना मिळणारे आशीर्वादही कुठेतरी उपयोगी पडल्याच्या भावना इथल्या कर्मचाऱ्यांच्या आहेत.

--------------------

Web Title: The experience of the staff working in the 'living man' cemetery in the world of corpses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.