खोडद मध्ये अनुभवली गुरू आणि शनीची महायुती सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:08 AM2020-12-23T04:08:25+5:302020-12-23T04:08:25+5:30
- खोडद : सूर्यमालेतील पाचव्या आणि सहाव्या स्थानावर असणाऱ्या गुरू आणि शनी या दोन वायुरूप ग्रहांची दुर्मिळ महायुती सोमवारी ...
-
खोडद : सूर्यमालेतील पाचव्या आणि सहाव्या स्थानावर असणाऱ्या गुरू आणि शनी या दोन वायुरूप ग्रहांची दुर्मिळ महायुती सोमवारी सायंकाळी खोडद येथे विद्यार्थ्यांनी व विज्ञानप्रेमींनी अनुभवली. सूर्यास्तानंतर नैऋत्य क्षितिजावर सुमारे एक ते दीड तास ही महायुती पाहण्याची दुर्मिळ संधी खोडद येथील ग्रामीण विज्ञान केंद्राच्या वतीने उपलब्ध करण्यात आली होती अशी माहिती जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष रतीलाल बाबेल व जुन्नर तालुका गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष प्रविण ताजणे यांनी दिली.
सोमवारी सायंकाळी सूर्यास्तानंतर या दोन ग्रहांमधील अंतर फक्त ०.१ अंश म्हणजे पौर्णिमेच्या चंद्राच्या व्यासाच्या पाच पटीने कमी म्हणजेच अंदाजे सुमारे सातशे किलोमीटर होते. साध्या डोळ्यांनी हे दोन ग्रह एकच असल्याचे जाणवले पण दुर्बिणीतून पाहताना शनिचे कडे गुरु ग्रह व त्याचे चार चंद्र व शनीचा एक चंद्र पाहायला मिळाला. या संधीचा आनंद घेताना व ही महायुती अनुभवताना यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहर्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.
यावेळी जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष रतीलाल बाबेल, जुन्नर तालुका गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष प्रवीण ताजणे, सचिव प्रशांत शेटे, खजिनदार व्यंकट मुंढे, डॉ.आनंद सराईकर,ऋषिकेश हांडे,ग्रामीण विज्ञान केंद्राच्या समन्वयक सुरेखा फाकटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
--
ही दुर्मिळ महायुती पाहण्याचा हा दुर्मिळ योग या नंतर १५ मार्च २०८० म्हणजे साठ वर्षानंतर येणार आहे.हा दुर्मिळ योग ज्या शालेय विद्यार्थ्यांनी पाहिला त्यांना परत साठ वर्षानंतर तो पाहण्याची संधी मिळणार आहे. या आधी हे दोन महाकाय ग्रह जवळ असण्याचा योग १२२६ व १६२३ मध्ये आला होता. ही युती १७ डिसेंबर २०२० पासून आपल्याला नैऋत्य दिशेला पहावयास मिळत होती,अजूनही आणखी चार-पाच दिवस आपल्याला ही युती पाहता येईल.
- प्रा.श्री.रतीलाल बाबेल अध्यक्ष, विज्ञान अध्यापक संघ,जुन्नर तालुका
--
२१ डिसेंबर २०२० रोजी या दोन मोठ्या ग्रहांमधील अंतर सर्वात कमी होते.सूर्यमालेतील हे दोन्ही ग्रह मोठे असल्यामुळे त्यांच्या जवळ येण्याला महायुती असे म्हटले आहे. गुरू ग्रहाला सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यासाठी ११ वर्षे ८ महिने लागतात तर शनीला २९ वर्षे ४ महिने लागतात.सर्वसामान्यांपर्यंत जर प्राथमिक पातळीवरील खगोलशास्त्रीय ज्ञान पोहोचले तर निश्चितच वैज्ञानिक मानसिकता विकसित होण्यास मदत होईल.
- सुधीर फाकटकर संचालक,ग्रामीण विज्ञान केंद्र,खोडद
-
फोटो : २२ खोडद महायुती
फोटो ओळी : सूर्यमालेतील पाचव्या आणि सहाव्या स्थानावर असणाऱ्या गुरू आणि शनी या दोन वायुरूप ग्रहांची दुर्मिळ महायुती सोमवारी सायंकाळी खोडद मध्ये विद्यार्थ्यांनी व विज्ञानप्रेमींनी अनुभवली.