प्रायोगिक नाटकांमुळे ‘व्यावसायिक’ला नवसंजीवनी : जब्बार पटेल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2019 06:00 AM2019-12-22T06:00:00+5:302019-12-22T06:00:05+5:30
नाटककाराचा आशय बंदिस्त करून नटांच्या माध्यमातून तो प्रेक्षकांना सांगायचा असतो. हे आव्हान मोठं असतं. नाटककार, दिग्दर्शन आणि मग नट, नेपथ्य या गोष्टी येतात. - जब्बार पटेल
नम्रता फडणीस -
डॉ. जब्बार पटेल हे नाव उच्चारलं, की रंगभूमी आणि चित्रपट कलामाध्यमातील अनेक अजरामर कलाकृती डोळ्यासमोर येतात. त्यामध्ये ‘घाशीराम कोतवाल’ या अभिजात कलाकृतीला विसरता येणे शक्य नाही. मराठी रंगभूमीवर हे नाटक मैलाचा दगड ठरला आहे. ‘प्रयोगशीलता’ हा त्यांचा स्थायी स्वभाव. केवळ एकाच विषयात गुंतून न राहता सातत्याने विविध माध्यमांमधून स्वत:ला सिद्ध करत राहण्याची त्यांची वृत्ती त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळीच उंची प्राप्त करून देते. त्यांच्यासारख्या एका प्रगल्भ, अनुभवसंपन्न अभिनेता-दिग्दर्शकाची शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ‘लोकमत’ने त्यांच्याशी साधलेला हा संवाद.
प्रश्न : नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदामागची भूमिका काय ?
ल्ल नाट्य संमेलनाचं अध्यक्षपद येणं हे जबाबदारीचं पद आहे. प्रायोगिक, व्यावसायिक, समांतर रंगभूमी, नाट्यगृह अशा नाट्यक्षेत्राशी निगडित अनेक गोष्टी असतात. शासनाचे धोरण असते. नाटक म्हटलं, की उपायांपेक्षा प्रश्नच अधिक असतात. नाटक उभ करणं इतकी सोपी गोष्टी नसते. चित्रपटाएवढं नाटक हे माध्यम खर्चिक नसतं असं मानलं गेलं, तरी हे शेवटी नाटककाराचं माध्यम आहे. दिग्दर्शक आणि अभिनेत्यावर खूप जबाबदारी असते. हे नाटककाराचं प्रभावी माध्यम आहे, हे लोकांच्या मनावर ठसणं आवश्यक आहे. नाटकाचा विषय हे सर्व ठरवतो. त्यानंतर रचना, नट ठरतात; मग सादरीकरण होतं. मग एकांकिका, नाटक, पथनाट्य असेल ते सगळे नियम त्यात बसणं आवश्यक असतं.
रंगभूमीवर नवीन पिढीदेखील नवनवीन प्रयोग करू पाहत आहे. त्याविषयी काय सांगाल?
ल्ल आज जिल्हावार विविध एकांकिका किंवा नाट्य स्पर्धा होतात. त्यामध्ये गुंतणारी नवीन पिढी, विशेषत: लेखकाच्या मनात काही तत्कालीन विचार येतात. काही तत्कालीन आणि मूलभूतही असतात. या विचारांवर आधारित नाटकं रंगमंचावर येतात. त्यांच्या मनात नक्की हे विचार कसे येतात? विदर्भ, मराठवाडा, पुणे, मुंबईमध्ये नक्की काय चाललंय? हे सगळं आगळवेगळं चित्र आहे. त्याबद्दल आपल्याकडे सविस्तर काही होतंय का? आदानप्रदान होतं का? हे बघावं लागेल.
प्रादेशिकचा भारतीय रंगभूमीशी कशा प्रकारे संबंध जोडता येऊ शकतो?
ल्ल इतर भारतीय भाषांमध्ये होणाºया नाटकांशीदेखील याचा संबंध नक्कीच जोडता येऊ शकतो. जे आत्ताचे संदर्भ आहेत, ते केवळ मराठी भाषा किंवा त्याला सांस्कृतिक भान आहे म्हणून ते तेवढ्यापुरतेच मर्यादित राहावेत का? याचाही विचार व्हायला हवा. भारतातही सामाजिक, राजकीय, स्त्री-पुरुष संबंध असे अनेक विषय असतात, जे रंगभूमीवर उमटत असतात. इतर भाषांमध्ये नक्की काय होतं? ते आपल्यात उमटतं का? त्याचे आंतरराष्ट्रीय संदर्भ काही आहेत का? ते सर्व रंगकर्मीशी बोलावं आणि ठरवावं लागेल. एकमेकांना मदत करता येणार असेल, तर त्या गोष्टी निश्चितच केल्या जातील.
जागतिक रंगभूमीच्या तुलनेत भारतीय रंगभूमी आज कुठे आहे असे वाटते?
ल्ल अमेरिका, युरोपसारख्या जागतिक स्तरावरच्या रंगभूमीवर वेगवेगळे विषय, त्याच्याशी निगडित नवनवीन प्रयोग केले जातात. प्रयोगशील नाटक हा त्यांचा हातखंडा आहे. त्यांच्या नाटकांची वर्गवारीच निश्चित असते. उदा.- ‘ब्रॉड वे’ ठरावीक जातकुळीवर आधारित नाटके, शेक्सपिअर किंवा इतर क्लासिक कलाकृती. जागतिक स्तरावर छोट्या-छोट्या नाट्यगृहातही कलाकृती होत असतात. त्यांच्याकडे ड्रामा स्कूल्स असल्यानं प्रयोग करणं सुरूच असतं. जागतिक रंगभूमीकडे तांत्रिक सफाई खूप असते. त्यामध्ये आपण काहीसं कमी पडतो. भारतीय रंगभूमीवरचे विषय हे संस्कृतीला धरून असले, तरी ते चांगले असतात. मात्र, त्याची मांडणी आणि प्रयोगशील प्रकार व व्यापक यश लोकांपर्यंत पोहोचणं, यात तफावत आढळते. जगभरात नाट्य शिक्षण हाच पाया आहे. मुळातच तुमचा पाया शास्त्रशुद्ध असायला प्रशिक्षण गरजेचं आहे.
प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीमध्ये काय फरक जाणवतो?
ल्ल व्यावसायिक नाटकांमध्ये प्रयोगशीलता शोधावी लागते. जोपर्यंत नवीन काही सांगत नाही, तोपर्यंत व्यावसायिक रंगभूमी तरी कशी बहरणार ना? त्याची मांडणीही वेगळी लागते. एका गोष्टीचा विस्तारच केला जातो. ती गोष्ट कशी सांगता त्यावर अवलंबून आहे. याबाबत प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीमध्ये फरक आढळतो. पण, प्रायोगिक नाटकांनी व्यावसायिक रंगभूमीला नेहमीच नवसंजीवनी दिली आहे. गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षांपासून हे चित्र कायम आहे. पूर्वी व्यावसायिक रंगभूमी स्वतंत्र होती, नट शिक्षित होतेच असे नाही. आता नाट्य शिबिरं आणि कार्यशाळा होतात. त्यामधून शिक्षित कलाकार बाहेर पडल्यामुळे खूप फरक पडला आहे.