‘परिवर्तन’च्या प्रयत्नांनी प्रायोगिक रंगभूमी सशक्त - ओंकार गोवर्धन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:10 AM2021-02-08T04:10:54+5:302021-02-08T04:10:54+5:30
पुणे : आजच्या काळात प्रायोगिक रंगभूमी ही सशक्त करण्यासाठी जळगावच्या परिवर्तन संस्थेचे मोलाचे योगदान आहे. परिवर्तनच्या नावीन्यपूर्ण नाट्य निर्मितीमुळे ...
पुणे : आजच्या काळात प्रायोगिक रंगभूमी ही सशक्त करण्यासाठी जळगावच्या परिवर्तन संस्थेचे मोलाचे योगदान आहे. परिवर्तनच्या नावीन्यपूर्ण नाट्य निर्मितीमुळे मराठी रंगभूमी समृद्ध व सशक्त बनत आहे, असे मत प्रसिद्ध अभिनेते ओकांर गोवर्धन यांनी व्यक्त केले.
परिवर्तन कला महोत्सवाच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. नाटकघर व अतुल पेठे आयोजित या तीन दिवसीय कला महोत्सवाचा समारोप रविवारी ( दि. ७) संत कबीर यांचा संगीतमय पद्धतीने शोध घेणा-या ''हंस अकेला'' ने करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, ''मिळून साऱ्याजणी'' च्या गीतांजली वि. म, अनिल पाटकर उपस्थित होते.
या कार्यक्रमात कबीराचा शोध परिवर्तनच्या कलावंतांनी उत्तमपणे घेतला. मन लागो यार फकिरी मे...हे गीत सुफी गायकी, वेस्टर्न, क्लासिकल, कव्वाली, पारंपरिक कबीर गायकी याप्रकारात सादर करीत श्रद्धा कुलकर्णी, अनुषा महाजन, अक्षय गजभिये यांनी मैफल जिंकून घेतली. विशाल कुलकर्णी यांनी पारंपरिक पद्धतीची कबीराची गायकी तर शास्त्रीय संगीतातल्या बंदिशींनी कबीराचे दोहे अक्षय गजभिये यांनी सादर केले. बंगाली बाऊलचा गोडवा साक्षी पाटील हिने उभा केला. खड्या स्वरात प्रतिक्षा कल्पराज हिने '' कोई नही अपना म्हणत'' आर्त स्वर लावला. ''माटी कहे कुंभार से'' यातील दार्शनिक तत्व हर्षदा कोल्हटकर यांनी उलगडून दाखवले. तर ब्रज भाषा व खडी बोलीतले दोहे नारायण बाविस्कर, विनोद पाटील यांनी सादर केले.योगेश पाटील यांनी बासरीवर तर ढोलकी, तबला, झेंबे या तालवादयांची बाजू मनीष गुरव यांनी सांभाळली.
''हंस अकेला'' चे निवेदन शंभू पाटील यांनी प्रभावीपणे करत कबीर उलगडून दाखवला.कबीराचे दोहे ऐकून रसिक मंत्रमुग्ध झाले होते. प्रतीक्षा कल्पराज हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
केले. जोत्सना भोळे सभागृह रसिकांच्या गर्दीने तुडुंब भरले होते. या हंस अकेलाने महोत्सवाचा समारोप झाला.
.....