प्रायोगिक एकांकिकांचे प्रमाण कमी : राजेंद्र ठाकूरदेसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 02:23 AM2017-08-10T02:23:52+5:302017-08-10T02:23:52+5:30

ते म्हणाले, ‘पुरुषोत्तम’ ही सलग पन्नास वर्षांहून अधिक काळ सुरू असलेली अशी एक स्पर्धा आहे, ज्यातून अनेक गुणी आणि प्रतिभावंत कलाकारांच्या पिढ्या घडल्या. सृजनशील कलाविष्कार सादर करण्यासाठीची हक्काची जागा म्हणूनही महाविद्यालयीन जीवनात या स्पर्धेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.

Experimental unemployment ratio is low: Rajendra Thakurdesai | प्रायोगिक एकांकिकांचे प्रमाण कमी : राजेंद्र ठाकूरदेसाई

प्रायोगिक एकांकिकांचे प्रमाण कमी : राजेंद्र ठाकूरदेसाई

Next

ते म्हणाले, ‘पुरुषोत्तम’ ही सलग पन्नास वर्षांहून अधिक काळ सुरू असलेली अशी एक स्पर्धा आहे, ज्यातून अनेक गुणी आणि प्रतिभावंत कलाकारांच्या पिढ्या घडल्या. सृजनशील कलाविष्कार सादर करण्यासाठीची हक्काची जागा म्हणूनही महाविद्यालयीन जीवनात या स्पर्धेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. एक काळ असा होता, की पुरुषोत्तममध्ये नावीन्यपूर्ण प्रयोगशील एकांकिका सादर व्हायच्या. उदा: नगरच्या महाविद्यालयाने सादर केलेली ‘मैत’ किंवा ‘गगनाला पंख नवे’ अशा एकांकिकांचा यासाठी आवर्जून उल्लेख करावा लागेल. ‘विकणे आहे का’ ही एकांकिका तर संपूर्ण अंधारातच सादर केली गेली. हात आणि चेहरा फ्लोरोसंट रंगात रंगविण्यात आले होते. आज पुरुषोत्तमध्ये अशा प्रयोगशील एकांकिकांचे प्रमाण खूप अत्यल्प आहे. एकांकिकांवर मालिका आणि तंत्रज्ञानाचा खूप मोठा प्रभाव असल्याचे जाणवते. लाईट्स, कॅमेरा या गोष्टींना विद्यार्थी जास्त महत्त्व देताना दिसत नाहीत. यातच काही वर्षांमध्ये विद्यार्थी लेखकांची संख्या लक्षणीयरीत्या वाढलेली आहे. परंतु नुसती संख्याच वाढली आहे, गुणवत्तेचे काय? हा प्रश्न काही प्रमाणात अनुत्तरितच आहे. स्पर्धेसाठी एकांकिका लिहायला विद्यार्थी एप्रिलमध्ये जागे होतात. लेखक म्हणून त्यांना नक्की काय मांडायचे आहे याचा विचार होताना दिसत नाही. स्पर्धेत नाटकाचे सादरीकरण करायला एक तासाचा अवधी मिळतो, त्यातील दहा मिनिटे ही नियोजनातच जातात. हातात मिळतात ५० मिनिटे. या पन्नास मिनिटांतच सीन्स बसवून पात्रे विकसित करावी लागतात. तुम्हाला सुचलेली गोष्ट खूप चांगली आहे; पण जे काही मांडायचे आहे, ते कागदावर कशा पद्धतीने उतरवायचे? याबाबत विद्यार्थी अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन घेतात का? हा प्रश्नच आहे. मार्गदर्शन घेण्यात चूक काहीच नाही; पण तितकेसे गांभीर्य विद्यार्थ्यांमध्ये पाहायला मिळत नाही.
एकांकिकांमध्ये वापरली जाणारी ‘भाषा’ हा तर एक स्वतंत्रच विषय आहे. स्पर्धेमध्ये मराठी भाषेतच एकांकिका सादर केली पाहिजे, हा नियम आहे. एकांकिकेमधील पात्र परप्रांतीय असेल तर हरकत नाही; पण कारण नसताना इंग्रजी आणि हिंदी शब्दांचा भरणा पाहायला मिळतो. वृत्तवाहिन्या आणि रेडिओचा प्रभाव संवादामधून प्रकर्षाने अनुभवायला मिळतो. एकांकिकेचे लेखन करण्यासाठी वाचन वाढवणे आवश्यक आहे. चांगली पुस्तके वाचली तर भाषेचे दालन समृद्ध होते. एखादी जुन्या काळातली कथा घेतली असेल तर तो कालावधी, संदर्भ याचा अचूक अभ्यास करणे गरजेचे आहे. मात्र, त्याचा काही अंशी अभावच जाणवतो. बहुतांश एकांकिका या मालिकेची कथा, सीन्स यांना डोळ्यांसमोर ठेवूनच लिहिल्या जातात. मात्र, परीक्षकांवर त्याचा फारसा प्रभाव पडत नाही. एकांकिका लेखनाकडे फारसे कुणीच गांभीर्याने पाहत नाही. महाविद्यालयातून बाहेर पडल्यानंतर त्यामधला एखाद-दुसरा अपवाद सोडला तर एकही विद्यार्थी नाट्यलेखनाकडे वळलेला दिसत नाही, याचे वाईट वाटते. पुरुषोत्तमच्या सुवर्णमहोत्सवी वाटचालीत सादर झालेल्या एकांकिकांच्या संहिता आम्ही जतन करून ठेवल्या आहेत. पुरुषोत्तमच्या सुवर्णमहोत्सवी वर्षातील संहिता आम्ही दोन खंड रूपात प्रसिद्ध केल्या, आजही करीत आहोत. पण या संहिता ठेवायच्या कुठे? असा आमच्यापुढचा प्रश्न आहे. या संहितांचे रेकॉर्ड ठेवण्याची जबाबदारी घेण्यास कुणी पुढाकार घेत असेल तर त्या व्यक्तीला आम्ही डिजिटल स्वरूपात संहिता देण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या काही वर्षांमध्ये पुरुषोत्तममधील एकांकिकांच्या सादरीकरणाचा ट्रेंड काहीसा बदलला आहे. स्पर्धेमध्ये नक्की काय अपेक्षित आहे, हेच विद्यार्थ्यांना नीटसे उमगलेले नाही. स्पर्धेत दिग्दर्शन, अभिनय आणि लेखन या तीनच गोष्टींना पारितोषिके दिली जातात. तरीही या गोष्टींपेक्षा तंत्रज्ञानावर विद्यार्थी भर देताना दिसत आहेत. यातच ही स्पर्धा म्हणजे प्रायोगिक एकांकिकेसाठीचे खुले व्यासपीठ मानले जाते. मात्र, विद्यार्थ्यांकडून प्रयोगशील एकांकिका सादर करण्याचे प्रमाण अत्यंत कमी असल्याची खंत महाराष्ट्र कलोपासक संस्थेचे चिटणीस राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

Web Title: Experimental unemployment ratio is low: Rajendra Thakurdesai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.