Pune: औंध रुग्णालय परिसरात कालबाह्य औषधे व सलाईनच्या बाटल्या
By ज्ञानेश्वर भोंडे | Published: November 3, 2023 06:29 PM2023-11-03T18:29:26+5:302023-11-03T18:29:51+5:30
जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीच्या टेरेसवरदेखील औषधांचा साठा, पीपीई किट आणि सलाईनचा साठा पडलेला आहे...
पुणे :औंध जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीच्या बाजूला असलेल्या औषध साठ्याच्या गाेडावूनच्या बाहेर सलाईनच्या बाटल्या, औषधे उघड्यावर फेकून दिली गेली आहेत. यापैकी बहुतांश औषधांची मुदत संपली असून काहींची मुदतही बाकी आहे. त्याचबराेबर जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीच्या टेरेसवरदेखील औषधांचा साठा, पीपीई किट आणि सलाईनचा साठा पडलेला आहे.
औंध जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीच्या बाजुला हे गाेडावून आहे. वास्तविक पाहता आताचे औषधांचे गाेडावून आहे ते म्हणजे जिल्हा शल्यचिकित्सक यांचा राहण्याचे निवासस्थान हाेते. आता त्याचेच गाेडावून तयार करण्यात आले आहे. तेथे औषधे ठेवले जातात. येथेच काेट्यावधींचे रेमडेसिव्हिरचाही साठा देखील पडून आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या टेरेसवर अडगळीतील सर्वच वस्तू टाकून देण्यात आल्या आहेत. यामध्ये कपाट, रॅक, टेबल, गाद्या, बेड आदी प्रकारच्या सामानांचा समावेश आहे. परंतु, आता तेथे आयव्ही बाॅटल, गाेळ्या, ओआरएसची पाकिटे, सलाईनच्या छाेट्या बाटल्या देखील आहेत.
जी गाेळ्या किंवा औषधे यांची मुदत संपून जाते त्याचे ऑडिट करून ते बायाेवेस्ट मेडिकलला द्यायला हवे किंवा त्याची शास्त्रशुध्द पध्दतीने विल्हेवाट लावावी लागते. परंतु, ही औषधे अशीच उघडयावर फेकून दिल्याने जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. तसेच याबाबत, गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
गाेडावूनच्या बाहेर आणि जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीच्या टेरेसवर ही औषधे, पाकिटे पडलेली आहेत. तसेच या गाेडावूनमध्ये काेटयावधींचे रेमडेसिव्हीर पडून आहे परंतु, त्याचे ऑडिट नाही. तसेच काेणत्याही औषधांचे ऑडिट हाेत नाही. याचा हिशाेबही व्हायला हवा. हाॅस्पिटल एकीकडे लाेकांना सांगते मेडिसिन नाही आणि दुसरीकडे आहे ते कच-यात फेकून दिले जातात.
- शरद शेट्टी, आराेग्य क्षेत्रातील कार्यकर्ते
जिल्हा रुग्णालयाकडून काेणतेही औषधे असे उघडयावर टाकली जात नाहीत. तसेच, काही असली तरी त्या संपलेली असावीत. याबाबत अधिक माहीती घेउन याेग्य ती कार्यवाही केली जाईल.
- डाॅ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा शल्यचिकित्सक, पुणे