‘सिरम इन्स्टिट्यूट’मधील आगीच्या कारणांचा होईना उलगडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:11 AM2021-02-16T04:11:23+5:302021-02-16T04:11:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना प्रतिबंधक लस बनविणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटमधील आगीच्या कारणांचा अद्यापही उलगडा झालेला नाही. ‘सिरम’मध्ये २१ ...

Explain the cause of the fire at the Serum Institute | ‘सिरम इन्स्टिट्यूट’मधील आगीच्या कारणांचा होईना उलगडा

‘सिरम इन्स्टिट्यूट’मधील आगीच्या कारणांचा होईना उलगडा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोना प्रतिबंधक लस बनविणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटमधील आगीच्या कारणांचा अद्यापही उलगडा झालेला नाही. ‘सिरम’मध्ये २१ जानेवारीला लागलेल्या भीषण आगीत पाच जणांना प्राण गमवावे लागले. या आगीच्या कारणांचा शोध घेण्याकरिता एमआयडीसी-पीएमआरडीए आणि पुणे महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या चार सदस्यांची समिती नेमण्यात आली होती. ही समिती अद्याप कोणत्याही निष्कर्षाप्रत पोचलेली नाही. ही समिती पोलीस आणि फॉरेन्सिक लॅबच्या अहवालाची प्रतीक्षा करीत असल्याचे सांगण्यात आले.

या प्रकाराच्या तपासाची सूचना स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेला देण्यात आली आहे. आग विझविल्यानंतर फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने काही नमुने ताब्यात घेऊन ते तपासणीस पाठविले. हा अहवाल अद्याप आलेला नाही. गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांनी १४ ते १५ प्रत्यक्षदर्शींपैकी अनेकांकडे चौकशी केली असून सर्वांचे जबाबही नोंदविले आहेत. अचानक आग लागल्याची ओरड उठल्याने सर्वांची धावपळ उडाली. परंतु, आग नेमकी कोठून, कशी लागली याबाबत कोणालाही स्पष्टपणे माहिती देता आलेली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निरीक्षकांकडूनही इलेक्ट्रिक सिस्टीमची पाहणी करण्यात आली आहे. त्यांचाही अहवाल प्रतीक्षेत आहे. अग्निशमन दल, महावितरण, एमआयडीसी आणि न्याय वैद्यक प्रयोगशाळेकडून (एफएसएल) घटनास्थळाची पाहणी करण्यात आलेली होती.

या आगीमध्ये प्रतीक पाष्टे (डेक्कन), महेंद्र इंगळे (नऱ्हे), रमा शंकर हरीजन, बिपीन सरोज (दोघेही रा. उत्तरप्रदेश), सुशीलकुमार पांडे (बिहार) या पाच जणांना जीव गमवावा लागला. हे पाचही जण अन्य सहकारी कामगारांसोबत इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर काम करीत होते.

‘सिरम’च्या चौथा व पाचव्या मजल्यावर आग लागली होती. यात पाचवा मजला पूर्णपणे जळून खाक झाला होता. तर, चौथ्या मजल्यावरील बहुतांश भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. तेथील सीसीटीव्ही तपासण्यात आले. मात्र आगीच्या कारणांचा शोध अद्यापही सुरुच असल्याने यामागे काही गूढ तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वास्तविक आतापर्यंत अग्निशामक दलाच्या समितीचा अहवाल अपेक्षित होता. परंतु, त्यांना फॉरेन्सिक आणि पोलिसांच्या तपासाच्या अहवालाची प्रतीक्षा असल्याचे सांगितले जाते.

Web Title: Explain the cause of the fire at the Serum Institute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.