एका महिन्यात खुनाचे तीन कट उघड

By admin | Published: September 18, 2016 12:59 AM2016-09-18T00:59:08+5:302016-09-18T00:59:08+5:30

मावळच्या भूमीत रक्ताचा सडा पसरविण्याच्या तयारीत असलेल्या तीन टोळ्या मागील महिनाभरात ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केल्या

Explained three cuts of murder in one month | एका महिन्यात खुनाचे तीन कट उघड

एका महिन्यात खुनाचे तीन कट उघड

Next


लोणावळा : संतमहंतांच्या पावनस्पर्शाने पुनित झालेल्या मावळच्या भूमीत रक्ताचा सडा पसरविण्याच्या तयारीत असलेल्या तीन टोळ्या मागील महिनाभरात ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केल्या आहेत. लोणावळा, तळेगाव व कामशेत येथे गणेशोत्सवादरम्यान शहरातील प्रतिष्ठित नागरिकांचा खून करण्याचा कट या टोळ्यांनी रचला होता. सुदैवाने व पोलिसांच्या सतर्कतेमुळे हे तिन्ही गुन्हे होण्याआधी कट उघडकीस आले.
मुंबई व पुणे या दोन्ही महानगरांचा मध्यबिंदू असलेल्या मावळचा झपाट्याने विकास होत आहे. खंडाळा घाटापासून सुरू झालेला हा मावळ तालुका देहूरोडच्या सीमेवर संपतो. यामध्ये नाणे, पवन व आंदर या तीन मावळांचा, तसेच लोणावळा, तळेगाव, देहूरोड, वडगाव मावळ, कामशेत या शहरांचा प्रामुख्याने समावेश होतोे.
गेल्या वर्षभरापासून मावळात सातत्याने खुनाच्या घटना, तसेच खुनाचे कट उघड होऊ लागल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. अवघ्या दोन महिन्यांच्या काळात मावळात पाच जणांचे खून झाले.
शिवाय महिनाभरात खुनाचा कट रचल्याच्या घटना एकामागून एक उघडकीस येऊ लागल्या आहेत. यावरून गुन्हेगारी मावळात पाय रोवण्याचा प्रयत्न करत असल्याचे उघडपणे दिसते.
राष्ट्रीय महामार्गामुळे मावळाचा विकास झपाट्याने होत आहे. त्यामुळे जमिनीला कोटीचे भाव आले असून, तेच या गुन्हेगारीचे मूळ कारण असल्याचे बोलले जात आहे. मुंबई व पुणे येथील काही गुन्हेगारी टोळ्या या अर्थकारणासाठी मावळात गुन्हेगारीच्या माध्यमातून पाय घट्ट रोवण्याचा प्रयत्न करत आहेत. लोणावळ्याचे नगराध्यक्ष अमित गवळी याचा वर्षभरात दोनदा खुनाचा कट पोलिसांनी उधळून लावला.
(वार्ताहर)
>पुणे-मुंबईतील टोळ्या सक्रिय...
मुंबईतील एका टोळीच्या हस्तकानेच ही सुपारी घेतली होती. मात्र, ती नेमकी कोणी दिली होती व कोणाच्या सांगण्यावरून मारण्याचा कट रचला होता, याचा शोध घेण्यात पोलिसांना अद्याप अपेक्षित यश आलेले नाही. मागील महिन्यात स्वारगेट येथे त्या हस्तकाला जेरबंद करण्यात आले. दरम्यान, अनंतचतुर्थीच्या आदल्या रात्री तळेगावातील राष्ट्रवादीचे नेते व संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांच्या खुनाचा कट व पेट्रोल पंपावरील दरोड्याचा प्रयत्न पुणे स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने उघडकीस आणला. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. तिसरा प्रकार म्हणजे अनंतचतुर्थीच्या रात्री कार्ला एमटीडीसी येथे दरोड्याच्या तयारीतील एक टोळी ताब्यात घेण्यात आली. कामशेत येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत विनोद व विजय गायकवाड या दोन जणांचा खून करण्याचा कट रचण्यात आला होता. या सर्व घटना पाहिल्यानंतर मावळात पुन्हा गुन्हेगारी डोके वर काढू लागली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: Explained three cuts of murder in one month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.