सिंथेटीक 'फुड' 'कलर'वर येवले चहावाल्यांचे स्पष्टीकरण, म्हणाले....
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 07:02 PM2020-01-22T19:02:46+5:302020-01-22T19:17:56+5:30
येवले चहामध्ये 'सिंथेटीक' कलर असल्याचे सांगण्यात आल्याने त्यावर आता येवले चहाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
पुणे : 'येवले' 'चहा'मध्ये 'सिंथेटीक फुड' कलर आढळून आल्याने हा चहा अन्न व प्रशासन विभागाकडून (एफडीए) असुरक्षीत घाेषीत करण्यात आल्याने येवले चहा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या आधी देखील लेबल दाेष असल्याने पाच लाख किमतीचा साठा एफडीएकडून जप्त करण्यात आला हाेता. आता पुन्हा चहामध्ये सिंथेटीक फुड कलर आढळल्याने चहावर कारवाई करणार असल्याचे एफडीएकडून प्रेस नाेटद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.
येवले चहाचे नमुने एफडीएकडून मैसुर येथील रेफरल प्रयाेगशाळेत पाठविण्यात आले हाेते. त्यापैकी 'टी मसाला' या पदार्थामध्ये 'टाट्रझीन सिंथेटीक' फुड कलर आढळून आला आहे. हा कलर चहात वापरण्यात येत असल्याने येवले चहा असुक्षीत घाेषीत करण्यात आला आहे. यावर आता येवले चहाचे संचालक नवनाथ येवले यांनी स्पष्टीकरण दिले असून एफडीएकडून अशाबाबतची कुठलिही नाेटीस आली नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सहा महिन्यात तीन ते चार वेळा एफडीएकडून चहाचे नमुने तपासणीसाठी घेऊन गेले असून येवलेवरच का कारवाई केली जाते ? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
पुण्यातील प्रसिद्ध 'येवले' 'चहा'मध्ये भेसळ असल्याचे सिद्ध ,FDA च्या अहवालातून उघड
येवले म्हणाले, याआधी अनेकदा एफडीएकडून आमच्या चहाचे नमुने तपासण्यात आले असून त्यात कुठलिही त्रुटी नसल्याचे सांगण्यात आले. सध्या जाे ठपका ठेवला जात आहे, त्याबाबतची कुठलिही नाेटीस अद्याप आम्हाला प्राप्त झाली नाही. ज्याप्रमाणे सिंथेटीक फुड कलर चहात टाकला जात असल्याचे म्हणण्यात आले आहे, तसा कुठलाही पदार्थ चहात टाकला जात नाही. ग्राहकांच्या आराेग्याशी आम्ही कधीही खेळत नाही. लाेकांना चांगली सेवा द्यायचा आमचा प्रयत्न आहे. येवलेचे नाव माेठे हाेत आहे त्यामुळे त्याला बाधा आणण्याचा प्रयत्न केले जात आहे. ग्राहाकांच्या आराेग्याशी खेळून आम्हाला पैसै कमवायचे नाहीत. आत्तापर्यंत चहावर कारवाई झाल्याचे पाहिले नाही. परंतु येवलेवरच कारवाई का केली जाते ? हा प्रश्न आहे.