पुण्यात लक्ष घालणारच, राज्यमंत्री विजय शिवतारेंचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 02:11 AM2019-01-07T02:11:05+5:302019-01-07T02:11:29+5:30
राज्यमंत्री विजय शिवतारे : मार्केट यार्ड येथे पत्रकार परिषदेत दिली माहिती
पुणे : शहर शिवसेनेमध्ये स्थानिक नेत्याअभावी नेतृत्वाची पोकळी निर्माण झाल्याचे सांगत आगामी काळात पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण शंभर टक्के लक्ष घालणार असल्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मार्केट यार्ड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
शिवतारे यांनी रविवारी (दि.६) मार्केट यार्डातील विविध प्रश्नांवर बैठक आयोजित केली होती. यावेळी शिवसेनेचे उपनेत आमदार तानाजी सावंत उपस्थित होते. शिवतारे म्हणाले की़, मुंबईप्रमाणेच पुणे शहराची वाढ गतीने होत आहे. शहराच्या हद्दीवाढीनंतर पुण्याने क्षेत्रफळामध्ये मुंबईलादेखील मागे टाकले आहे. त्यामुळे नवी मुंबईच्या धर्तीवर नवे पुणे निर्माण व्हावे यासाठी पुढील पन्नास वर्षांचा विचार करून शहराच्या विकासाचे नियोजन केले पाहिजे अशी भूमिका घेतली. पुण्यात शिवसेनेचे नेते आले की, त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी होते. परंतु स्थानिक नेतृत्व नसल्याने नागरिकांना प्रश्न कोणाकडे घेऊन जावे असा प्रश्न निर्माण होतो. नेतृत्वाची ही पोकळी भरुन काढण्यासाठी आपण यापुढे पुणे शहरामध्ये लक्ष घालणार असल्याचे शिवतारे यांनी स्पष्ट केले. यापूर्वी पंधरा वर्षे सत्तेत असलेल्याने शहराच्या कचरा, पाणी, वाहतूक या सारखे प्रश्न सोडविण्यासाठी लाँगटर्म विचार न केल्याने सध्या शहरात गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पुणे अथवा बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत विचारले असता, ते म्हणाले की, पक्षाकडून आदेश आला, तर त्याचे पालन केले जाईल़
दिवे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा बाजार
४पुरंदर तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळापाठोपाठ आंतरराष्ट्रीय दर्जाचा बाजार उभारण्यात येणार असून, यासाठी दिवे परिसरात सुमारे ४०० एकर जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत विभागीय आयुक्तांना दोन महिन्यात सविस्तर अहवाल देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. यामुळे हा प्रश्नदेखील लवकरच मार्गी लागेल. या आंतरराष्ट्रीय बाजार अत्याधुनिक सोयी-सुविधांनी युक्त असून, वीज, पाणी, शीतगृह आदी सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे मागणी आणि पुरवठ्यावर नियंत्रण ठेवणे शक्य होणार असून, शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. प्रस्तावित विमानतळ आणि रेल्वेलाईनमुळे शेतकºयांना आपला माल देश-विदेशात पाठवणे सहज शक्य होणार असल्याचे शिवतारे यांनी स्पष्ट केले.
निधीअभावी भूसंपादन रखडले
४पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी तब्बल साडेतीन हजार कोटी रुपये लागणार आहे. सध्या निधी नसल्याने भूसंपादनाचे काम रखडले आहे. परंतु एवढा मोठी निधी उभा करण्यासाठी शासनाने एसपीव्ही स्थापन केली असून, लवकरात लवकर निधीची उपलब्ध करुन देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यामुळे निधी उपलब्ध झाल्यानंतर मुंबई-नागपूर समृद्धी मार्गाच्या धर्तीवर तीन महिन्यांत भूसंपादनाचे काम पूर्ण होईल, असा विश्वास राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी येथे व्यक्त केला.