विधानसभेपूर्वी तुतारी हाती घेणार?; चर्चेनंतर भाजप आमदार अश्विनी जगताप यांचं स्पष्टीकरण 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 03:41 PM2024-09-19T15:41:42+5:302024-09-19T15:43:47+5:30

भाजपच्या विद्यमान आमदार अश्विनी जगताप यादेखील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

Explanation of BJP MLA Ashwini Jagtap over joining sharad pawar ncp | विधानसभेपूर्वी तुतारी हाती घेणार?; चर्चेनंतर भाजप आमदार अश्विनी जगताप यांचं स्पष्टीकरण 

विधानसभेपूर्वी तुतारी हाती घेणार?; चर्चेनंतर भाजप आमदार अश्विनी जगताप यांचं स्पष्टीकरण 

BJP Ashwini Jagtap ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीपूर्वी नेत्यांच्या पक्षांतराला वेग आला असून  चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या विद्यमान आमदार अश्विनी जगताप यादेखील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. मात्र या चर्चेत कसलंही तथ्य नसून मी भाजप सोडणार नाही, असा खुलासा जगताप यांनी केला आहे.

पक्षांतराच्या चर्चा फेटाळून लावताना अश्विनी जगताप यांनी म्हटलं आहे की, "माझ्या पक्षांतराच्या बातम्या खोट्या आहेत. कोणीतरी हे वावटळ उठवलं आहे आणि त्याला विरोधक खतपाणी घालत आहेत. माझे पती गेल्यानंतर पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून मला पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली आणि निवडून आणलं. या माध्यमातून त्यांनी माझ्या पतीला श्रद्धांजली वाहिली. ते आणि देवेंद्रजी खूप चांगले मित्र होते. देवेंद्रजी या भागात आल्यानंतर नेहमी आमच्या घरी यायचे. त्यामुळे पक्ष सोडून जाणं हे माझ्या डोक्यात अजिबात नाही," असं स्पष्टीकरण आमदार जगताप यांनी दिलं आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत पक्षाने दीर शंकर जगताप यांना उमेदवारी दिल्यास मी स्वत: त्यांचा प्रचार करेन, असंही जगताप यांनी म्हटलं आहे.

मतदारसंघात कशी आहे राजकीय स्थिती?

पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत तिरंगी सामना रंगला होता. या निवडणुकीत अश्विनी जगताप यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांचा पराभव केला होता. हे नाना काटे सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षात असून ते लवकरच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. काटे यांनी तसे संकेतही दिले आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवडच्या राजकारणात आगामी काळात नेमक्या काय राजकीय घडामोडी घडतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 
 

Web Title: Explanation of BJP MLA Ashwini Jagtap over joining sharad pawar ncp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.