कष्टक-यांच्या नशिबी शोषण
By admin | Published: November 19, 2014 04:30 AM2014-11-19T04:30:28+5:302014-11-19T04:30:28+5:30
सर्वाधिक मिळणारे बिगारी काम हे अतिश़य कष्टाचे असते. दिवसभर डोक्यावरून सिमेंटच्या गोण्या वाहने, रेती टाकणे, रेती चाळणे,
सर्वाधिक मिळणारे बिगारी काम हे अतिश़य कष्टाचे असते. दिवसभर डोक्यावरून सिमेंटच्या गोण्या वाहने, रेती टाकणे, रेती चाळणे, गिट्टी भरणे तसेच रेती, गिट्टी, व सिमेंटचे मिश्रण तयार करणे, आदी कामाचा त्यात समावेश होतो. गवंडीकाम करण्यात कष्टासह कौशल्य पणाला लागते. विटा वाहणे, खडी व दगड टाकणे, रस्त्याच्या कामाला डांबर टकणे, बिगारी काम करणे, खोदकाम करणे, काँक्रिटीकरणाची कामेही करावी लागतात. इमारतींच्या पाचव्या-सहाव्या मजल्यावर सिमेंटच्या गोण्या न्याव्या लागतात. ही अंगमेहनतीची तसेच पडेल ती कामे सर्वच कामगारांना करावी लागतात. मजूरांना अनेकदा खोदकाम करावे लागते. घरासाठी पाया खोदणे, शेतीला कुंपण घालणे अथवा झाडे लावण्यासाठी मुरुम, खडक फोडून खोदकाम करण्याची कामे दिवसभर करावी लागतात. टिकाव, फावडे व पहारीच्या साहाय्याने अशी कामे करताना अनेकदा मजुरांच्या तळहातावर फोड येतात. मात्र त्या वेदना सहन करूनही दुसऱ्या दिवशी पुन्हा कामावर हजर राहण्यावाचून पर्याय नसतो. काही ठिकाणी माती काढायची असे सांगून झिरपा पद्धतीच्या स्वच्छतागृहाच्या टाक्यांमधील मैलाही काढण्यास लावले जात असल्याचे अनुभव कामगारांनी सांगितलं. कोणाच्याही नशिबी नकोत अशी कामे घाण्याला जुंपलेल्या बैलासारखी निमुटपणे करावी लागतात. समाजाचा मजुरांकडे पाहण्याचा दष्टिकोन बदलत आहे. महिला व पुरूषांना काम करताना शिवीगाळ करणे, महिलांप्रति ठेकेदाराचे वर्तन असभ्य असण्याचा प्रत्यय नेहमी येतो. निरक्षरतेमुळे त्यांच्याकडे पाहण्याचा अनेकांचा दृष्टिकोन चांगला नसतो.
काही ठेकेदार व काम देणारे परिस्थिती समजून काम करून घेतात. विशेषत: शेतीकामे करताना शेतकऱ्यांकडून मजुरांना जेवणाची सोय करून दिल्याने मायेचा ओलावा कधीतरी अनुभवास येतो. बांधकाम क्षेत्रातही नेहमीचा परिचय असणारे व कष्टाची जाण असणारे ठेकेदार कामाचा योग्य मोबदला देतात. शहरात गवंडीकामास ७०० रूपये, बांधकामास ६००, पुरूष बिगारी ४००, स्त्री बिगारी ३००, खोदकामास ४०० रूपये दर आहे. मात्र ठेकेदार शोषण करतात तेंव्हा गवंडीकामास ५०० रूपये, बांधकामास ४००, पुरूष बिगारी ३००, स्त्री बिगारी २००, तर खोदकामास ४०० दिले जातात.