पूजा खेडकरांचे कारनामे पोहोचले दिल्लीत, ‘पीएमओ’ने मागवला अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 06:08 AM2024-07-12T06:08:08+5:302024-07-12T06:08:45+5:30

गाडीची चौकशी करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना आईची दमदाटी

Exploits of IAS student Pooja Khedkar reached the Prime Minister office directl | पूजा खेडकरांचे कारनामे पोहोचले दिल्लीत, ‘पीएमओ’ने मागवला अहवाल

पूजा खेडकरांचे कारनामे पोहोचले दिल्लीत, ‘पीएमओ’ने मागवला अहवाल

पुणे : प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांच्या कारनाम्यांची खबर थेट पंतप्रधानांच्या कार्यालयापर्यंत पोहोचली असून, पीएमओने याबाबतचा अहवाल मागितला आहे. तसेच, मसुरीतील लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशिक्षण अकादमीनेही राज्य सरकारला याबाबत अहवाल देण्यास सांगितले आहे. दरम्यान, त्यांच्या गाडीची चौकशी करण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाही त्यांच्या आईने दमदाटी केली.

पूजा खेडकर यांनी अंशतः दृष्टिहीन आणि मानसिकदृष्ट्या विकलांग असल्याचे प्रमाणपत्र दिले होते. त्यातून त्यांना आयएएस परीक्षेत ८२१वी श्रेणी मिळून महाराष्ट्र केडर मिळाले होते. सुरुवातीला प्रशिक्षणासाठी त्यांना भंडारा जिल्हा देण्यात आला. मात्र, नाट्यमय घडामोडींनंतर पुणे देण्यात आला. रुजू होण्यापूर्वीच त्यांनी स्वतंत्र गाडी, बंगला, दालन तसेच कर्मचाऱ्यांची मागणी केली. दालनाची व्यवस्था न केल्याने अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचे दालन बळकावले. स्वत:च्या ऑडीवर लाल दिवा लावला.

‘ऑथराइझ नाही मी तुम्हाला काही सांगायला’

विविध विषयांबाबत गाजत असलेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर ‘ऑथराइझ नाही, मी तुम्हाला काही सांगायला’ असे म्हणत गुरुवारी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू झाल्या आहेत .

परिविक्षाधीन आयएएस अधिकारी पूजा खेडकर गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू हाेणार तेव्हा पत्रकारांनी त्यांच्यावर हाेत असलेल्या आराेपाबाबत त्यांना छेडले असता त्यांनी, ‘सॉरी, गव्हर्न्मेंट रुलनुसार मी तुम्हाला काहीही सांगू शकत नाही,’ असे म्हणत पदभार स्वीकारला. 

१७ कोटींची मालमत्ता

खेडकर यांनी यूपीएससीला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात १७ कोटी रुपयांहून अधिक स्थावर मालमत्ता असल्याचे सांगितले आहे. तसेच त्यांचे वार्षिक उत्पन्नही ४२ लाख रुपयांचे असून, त्यांच्या वडिलांकडे एकत्रित ११० एकर जमीन आहे. हे शेतजमीन कमाल मर्यादा धारण कायद्याचे उल्लंघन असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला.

वाहतूक नियमभंगात २१,००० थकीत दंड

पूजा खेडकर यांच्याकडे मोटारीने वाहतूक नियमभंग केल्याप्रकरणी २१ हजार रुपयांचा थकीत दंड आहे. त्यामुळे मोटार वाहन अधिनियमान्वये (मोटार व्हेईकल ॲक्ट १७७) खेडकर यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली.

मुख्य सचिवांच्या दालनात धडक

खेडकर या बुधवारी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या दालनात परवानगीशिवाय घुसल्या. त्यामुळे चिडलेल्या सौनिक यांनी त्यांना अक्षरश: हाकलून दिले. त्या वेळ न मागता आत आल्याने कामात व्यग्र असल्याचे सांगून त्यांनी खेडकर यांना जाण्यास सांगितल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.

केंद्राकडून एकसदस्यीय समिती नियुक्त : परिवीक्षाधीन अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर होणाऱ्या आरोपासंदर्भात चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने कार्मिक आणि प्रशिक्षण खात्याचे अतिरिक्त सचिव यांची एकसदस्यीय समिती नियुक्ती केली आहे. समितीला दोन आठवड्यात अहवाल सादर करण्यासंदर्भात आदेश देण्यात आले आहेत.

निघून जा, नाहीतर सर्वांना आतमध्ये टाकेन... 

खासगी गाडीवर सरकारी दिवा लावल्याप्रकरणी नियमांचे उल्लंघन झाले असल्याने पोलिसांनी खेडकर यांच्या पुण्यातील घरावर मोर्चा वळविला. तेव्हा खेडकर यांच्या आईने पोलिसांनाच दमदाटी केल्याचा प्रकार उघडकीस आल्याचे समजते. तसेच या घटनेचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींना त्या महिलेने सर्वांना आतमध्ये टाकेन, अशी धमकीही दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
 

Web Title: Exploits of IAS student Pooja Khedkar reached the Prime Minister office directl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.