गॅसची अफरातफर करताना स्फोट; दोन जण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 09:41 AM2023-10-30T09:41:09+5:302023-10-30T09:42:36+5:30
भारत गॅसच्या घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून दुसऱ्या टाकीत बेकायदेशीरपणे गॅस भरला जात असताना मोठा स्फोट झाला
पुणे : हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका गॅसच्या टाकीतून दुसऱ्या टाकीमध्ये गॅस भरताना स्फोट झाला. आगीची घटना समजताच अग्निशमन विभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, स्फोटामुळे दोन जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर मांजरी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
अधिक माहितीनुसार, बेलेकर वस्ती, मांजरी येथील एका गोडाऊनमध्ये भारत गॅसच्या घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून दुसऱ्या टाकीत बेकायदेशीरपणे गॅस भरला जात असताना मोठा स्फोट झाला. यामध्ये कामगार प्रेम राव शेख (४७, रा. हांडेवाडी, हडपसर) आणि रमेश रतन कुरूमकर (२९, रा. विघ्नहर्ता पार्क, गवळी वस्ती, मांजरी) हे दोघे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी गोडाऊन मालक सुमित सुनील घुले (४०, रा. वृंदावन सोसायटी, बेलेकर वस्ती, मांजरी) याला ताब्यात घेतले असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती, अशी माहिती हडपसर ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दिली.