संभाजी ब्रिगेडच्या पत्त्यावर पुन्हा स्फोटकांचे पार्सल
By admin | Published: July 18, 2015 04:30 AM2015-07-18T04:30:53+5:302015-07-18T04:30:53+5:30
संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक अजय भोसले यांच्या पाठोपाठ अरोरा टॉवरमधील एका उद्योजकाच्या कार्यालयामध्ये संभाजी ब्रिगेडच्या कार्याध्यक्षांच्या नावाने दोन वायर
पुणे : संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक अजय भोसले यांच्या पाठोपाठ अरोरा टॉवरमधील एका उद्योजकाच्या कार्यालयामध्ये संभाजी ब्रिगेडच्या कार्याध्यक्षांच्या नावाने दोन वायर, केमिकल पावडर, बंदुकीतून उडालेली पुंगळी असे स्फोटक असलेले पार्सल पाठविण्यात आले आहे. संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना एका पाठोपाठ येत असलेल्या स्फोटकांच्या पाकिटांमुळे खळबळ उडाली आहे.
कॅम्प भागातील अरोरा टॉवरमध्ये उद्योजक सतीश चव्हाण यांचे कार्यालय आहे. त्यांच्या कार्यालयाच्या पत्त्यावर संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष शिंदे यांच्या नावाने खाकी रंगाचे पार्सल आले. चव्हाण यांच्या कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांनी हे पाकीट उघडले. त्यामध्ये बंदुकीतून उडालेली पुंगळी, दोन वायर आणि पिवळसर रंगाची केमिकल पावडर आढळली. त्यांनी लगेच पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून घटनेची माहिती दिली. बॉम्बशोधक पथकाने येऊन पाकिटाची तपासणी केली. या प्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
चव्हाण मूळचे सांगली जिल्ह्यातील असून, पश्चिम महाराष्ट्रात त्यांचा व्यवसाय आहे. ते संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमांना उपस्थित राहत असतात. तसेच सांगलीमध्ये झालेल्या संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनाला त्यांनी मदत केलेली होती. पोलिस उपायुक्त सुधाकर पठारे, सहाय्यक आयुक्त आत्मचरण शिंदे, पोलिस निरीक्षक बरकत मुजावर यांनी चव्हाण यांच्या कार्यालयास भेट देऊन पाहणी केली.
आधीचे पार्सल सदाशिव पेठेतून
चार दिवसांपूर्वीच संभाजी ब्रिगेडच्या अजय भोसले यांना त्यांच्या जिजाई प्रकाशनच्या पत्त्यावर अशाच पद्धतीने स्फोटकांचे पार्सल पाठविण्यात आले होते. अंनिसचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येशी या घटनेचा संबंध आहे का, कोणत्या उद्देशाने ही पार्सले पाठविली जात आहेत, याचा तपास पोलीस करीत आहेत.
रस्त्यावर उतरून आंदोलन करू
बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याला संभाजी ब्रिगेडकडून विरोध केला जात आहे. संभाजी ब्रिगेड पार्सलमध्ये स्फोटक पाठविण्याच्या धमक्यांना भिक घालणार नाही. परिवर्तनवादी संघटनांना सोबत घेऊन संभाजी ब्रिगेडकडून रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल.
- संतोष शिंदे,
जिल्हा कार्याध्यक्ष, संभाजी ब्रिगेड