‘प्रेमा’च्या सणासाठी मावळ तालुक्यातून झाली दीड कोटी गुलाबांची निर्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 13:45 IST2018-02-09T13:38:33+5:302018-02-09T13:45:17+5:30
प्रेमाचा सण अशी ओळख असलेल्या व्हॅलेंटाइन डेकरिता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतमावळ तालुक्यातून या वर्षी विक्रमी दीड कोटी गुलाब फुलांची निर्यात करण्यात आल्याने परदेशी बाजारपेठेत मावळातील गुलाब भाव खात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

‘प्रेमा’च्या सणासाठी मावळ तालुक्यातून झाली दीड कोटी गुलाबांची निर्यात
लोणावळा : प्रेमाचा सण अशी ओळख असलेल्या व्हॅलेंटाइन डेकरिता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतमावळ तालुक्यातून या वर्षी विक्रमी दीड कोटी गुलाब फुलांची निर्यात करण्यात आल्याने परदेशी बाजारपेठेत मावळातील गुलाब भाव खात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. २५ जानेवारी ते ८ फेब्रुवारी या कालावधीत ही फुले परदेशी बाजारपेठेत एक्स्पोर्ट करण्यात आली असल्याची माहिती पुणे जिल्हा फुलउत्पादक संघाचे अध्यक्ष शिवाजी भेगडे व पवना फुलउत्पादक संघाचे अध्यक्ष मुकुंद ठाकर यांनी दिली.
मावळ तालुक्यात जवळपास १२०० एकर जागेवर फुलांचे उत्पादन घेतले जाते. भारतातील जवळपास ७० टक्के फुल उत्पादन एकट्या मावळ तालुक्यात घेतले जाते. मावळातील शेतकरी व कंपन्या मिळून जवळपास साडेपाचशे ते सहाशे जण या व्यवसायात आहेत. मावळ तालुक्यातील वातावरण व जमीन हे फुल उत्पादनाकरिता पोषक असल्याने मावळात मोठ्या प्रमाणात फुलांचे उत्पादन घेतले जाते.
या वर्षी फुलांच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली असून, परदेशी बाजारपेठेसह स्थानिक भारतीय बाजारपेठेत फुलांना मोठी मागणी असल्याने फुल उत्पादक शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे. परदेशी बाजारात गुलाब फुलांना या वर्षी सरासरी १३ ते १५ रुपये व भारतीय बाजारपेठेत ८ ते १० रुपये भाव मिळाला असल्याचे मुकुंद ठाकर यांनी सांगितले.