उघड्यावरच टाकल्या केबल
By admin | Published: April 10, 2015 05:36 AM2015-04-10T05:36:15+5:302015-04-10T05:36:15+5:30
सुमारे ७ कोटी रुपये खर्च करून बारामती शहरात भूमिगत वीजवाहिन्यांचे काम करण्यात आले आहे. बहुतेक ठिकाणचे काम पूर्ण झाले आहे
बारामती : सुमारे ७ कोटी रुपये खर्च करून बारामती शहरात भूमिगत वीजवाहिन्यांचे काम करण्यात आले आहे. बहुतेक ठिकाणचे काम पूर्ण झाले आहे; परंतु कामाचा दर्जा, त्यासाठी वापरलेले साहित्य निकृष्ट असल्याने वीज महावितरणच्या ठेकेदाराने बारामती नगरपालिकेला ‘चुना’ लावला असल्याचे चित्र आहे. बारामती नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. वीजवाहिन्या ‘बर्स्ट’ होण्याचे प्रकार घडले आहेत. त्याची दुरुस्ती करण्याची जबाबदारी मात्र महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर येऊन पडते. नगरपालिकेत यावर विचारणा केल्यानंतर ८ दिवसांत कामाचा दर्जा तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
बारामती नगरपालिकेची जुनी हद्द आणि नवीन वाढीव हद्दीत भूमिगत वीजवाहिन्यांचे काम दोन वर्षांपासून सुरू आहे. वीजवाहिन्या जमिनीत गाडण्यासाठी खोल चाऱ्या घेण्याची तसदीदेखील ठेकेदाराने पार पाडली नाही. त्याचबरोबर सिमेंटच्या फुटक्या पाईपचा वापर वीजवाहिन्यांवर आच्छादन करण्यासाठी केला आहे. या सिमेंटचे पाईप कामगारांनी उचलतानाच फुटलेले आहेत. या कामाच्या दर्जाकडे कोणाचेच लक्ष नाही. भूमिगत वीजवाहिन्यांचे काम वेगळे, पथदिव्यांसाठी खांब उभे करण्यासाठी वेगवेगळे ठेके देण्यात आले आहेत. त्यामुळे एकाच कामावर दोन वेळा खोदाई करावी लागते. या परिस्थितीत मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसात अनेक ठिकाणच्या भूमिगत वीजवाहिन्या ‘बर्स्ट’ झाल्या. त्याचा घोटाळा काढताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांना नाकी नऊ आले. एका ठिकाणचा घोटाळा काढल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी पुन्हा तोच प्रकार घडत होता. पावसाळ्यात हा त्रास वाढण्याची शक्यता आहे.
भूमिगत वीजवाहिन्या टाकत असताना अरुंद रस्ते, गल्लीबोळांमध्ये मनमानी पद्धतीने काम करण्यात आले आहे. केबल उघड्यावर आहेत. या केबलचा दर्जादेखील तपासण्याची गरज आहे. नगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत याविरोधात नगरसेवक सुभाष ढोले यांनी विचारणा केली. त्यानंतर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण शहरातील कामाचा दर्जा तपासून अहवाल ८ दिवसांत सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. या अहवालाची प्रतीक्षा आहे.
सद्य:स्थितीला वीजवाहिन्यांचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे चित्र आहे. पथदिव्यांसाठी खड्डे खोदून सिमेंटच्या चौथाऱ्यावर खांब उभे करण्याचे काम आहे. ठेकेदाराने त्यामध्येदेखील ‘ठकगिरी’ केली आहे. त्यामुळे आताच खांब वेडेवाकडे होण्याचे प्रकार घडत आहेत. एकूणच, संपूर्ण कामांची चौकशी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
(प्रतिनिधी)