बारामतीत पोलिसांच्या सतर्कतेमुळे बनावट रेमडेसिविर विक्री रॅकेटचा पर्दाफाश; ४ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 03:21 PM2021-04-17T15:21:44+5:302021-04-17T15:23:36+5:30
राज्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याने रूग्णांसह नातलगांचा देखील जीव टांगणीला लागला आहे.
बारामती : रेमडेसिविरच्या तुटवड्याचा फायदा उचलत बारामतीमध्ये मोकळ्या झालेल्या रेमडेसिविरच्या बाटल्यांमध्ये लिक्विड पॅरासिटीमॉल भरून ३५ हजार रूपयांना एक इंजेक्शन विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. सापळारचून बारामती येथील पेन्सिल चौकात शुक्रवारी (दि. १६) मध्यरात्री बारामती ग्रामीण पोलिसांनी चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
बनावट रेमडेसिविर विक्रीमध्ये बारामतीतील एका कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याचा यामध्ये सहभाग आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेला देखील मोठा धक्का बसला आहे.
या प्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनचे निरीक्षक विजय नगरे यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी मुख्य सुत्रधार दिलीप ज्ञानदेव गायकवाड (वय ३५, रा. काटेवाडी, ता. बारामती) याच्यासह प्रशांत सिध्देश्वर घरत (वय २३, रा. भवानीनगर, ता. इंदापूर),संदिप संजय गायकवाड (रा. काटेवाडी, ता. बारामती), शंकर दादा भिसे (वय २२, रा. काटेवाडी, ता. बारामती) यांना बारामती ग्रामीण पोलिसांनीअटक केली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये वेगाने संक्रमण होत आहे. अशा परिस्थितीत राज्यात रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याने रूग्णांसह नातलगांचा देखील जीव टांगणीला लागला आहे. नेमक्या याच परिस्थितीचा फायदा उचलत रेमडेसिव्हीरच्या काळ्याबाजाराला देखील प्रचंड जोर आला आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती शहरासह तालुक्यात देखील रेमडेसिविरचा काळा बाजार होत असल्याची खबर बारामती ग्रामीण पोलिस ठाण्याचा मिळाली होती. त्यासाठी खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचत काळाबाजर करणाऱ्या आरोपींशी संपर्क साधण्यात आला. यावेळी आरोपीने ३५ हजार रूपयांना एक इंजेक्शन मिळेल. तुम्ही पेन्सिल चौकामध्ये या, असे सांगितले. यावेळी बारामती ग्रामीण पोलिसांनी पेन्सिल चौकात सापळा रचला ठरल्या वेळेप्रमाणे रात्री साडेबाराच्या दरम्यान आरोपी प्रशांत घरत व शंकर भिसे पांढऱ्या रंगाच्या फॉर्च्यूनर कार (एमएच ४३, एमव्ही, ९६९६) मधून आलेल्या आरोपींची व खबऱ्याची भेट झाली. प्रसंगावधान दाखवत पोलिसांनी तातडीने चार आरोपींना ताब्यात घेतले.
दरम्यान, कोविड सेंटरमध्ये सफाई कार्मचारी म्हणून काम करीत असलेल्या अवघ्य २२ वर्षाचा संंदिप गायकवाड हा मोकळ््या झालेल्या रेमडेसिविरच्या बाटल्यांमध्ये पॅरासिटीमॉल भरून मुख्य सुत्रधार दिलीप गायकवाड याच्याकडे देत होता. या बदल्यात संदिपला १० ते १२ हजार रूपये दिले जात होते. सिरिंजच्या सहाय्याने या बाटल्यांमध्ये पॅरासिटीमॉल भरून अवघ्या दहा ते पंधरा रूपयात ही बनावट रेमडेसिव्हीर तयार करून ३५ हजार रूपयांना एक या प्रमाणे काळया बाजाराने विकले जात होते. तसेच रेमडीसीव्हीरच्या मागणीसाठी कोणी संपर्क साधला तर इंजेक्शन पोहचवण्याची जबाबदारी प्रशांत घरत व शंकर भिसे यांच्यावर होती. आतापर्यंत या रॅकेटमध्ये चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. आणखी यामध्ये कोण सहभागी आहे का याबाबत चौकशी सुरू आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात या रॅकेटच्या माध्यमातून नविन माहिती समोर येणार आहे. आरोपींवर जीवनावश्यक वस्तू अधिनियमन कायदा, औषधे व सौदर्यप्रसाधने कायदा, औषध किंमत नियंत्रण कायद्यन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईबद्दल ग्रामीण पोलिस अधिक्षकांच्या वतीने बारामती ग्रामीण पोलिस ठाण्याला २५ हजाराचे बक्षिस जाहिर करण्यात आले आहे. या कारवाईमध्ये पोलिस निरिक्षक महेश ढवाण, हवालदार आर. जे. जाधव, आर. एस. भोसले, डी. एन. दराडे, निखिल जाधव आदींनी सहभाग घेतला.
बनावट रेमडेसिव्हीर इंजेक्शनमुळे कोणत्या रूग्णाला अपाय झाला आहे का किंवा कोणता रूग्ण दगावला गेला आहे का याबाबत अजून चौकशी सुरू आहे. या प्रकरणी नविन माहिती समोर येईल तशी आरोपींंवर कलमे वाढत जाणार आहेत. नागरिकांनी देखील काळ््याबाजार मिळणारी कोणतिही औषधे खरेदी करू नयेत. त्यामुळ तुम्हाला आर्थिक झळ तर बसणारच आहे. त्याचप्रमाणे तुमच्या रूग्णाचा जीव देखील धोक्यात येणार आहे. मान्यताप्राप्त औषधालय, अथवा शासकीय रूग्णालयामधूनच औषधे घ्यावीत.
- नारायण शिरगावकर, उपविभागिय पोलिस अधिकारी, बारामती.