विषवल्ली तंबाखू समाजातून हद्दपार करावी

By admin | Published: May 31, 2017 01:21 AM2017-05-31T01:21:45+5:302017-05-31T01:21:45+5:30

तंबाखूच्या उत्पादनावर नियंत्रणं आणल्यास व्यसनावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. देशात तरुणांमध्ये तंबाखूचे व्यसन आणि

Exposure to poisonous tobacco society | विषवल्ली तंबाखू समाजातून हद्दपार करावी

विषवल्ली तंबाखू समाजातून हद्दपार करावी

Next

तंबाखूच्या उत्पादनावर नियंत्रणं आणल्यास व्यसनावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. देशात तरुणांमध्ये तंबाखूचे व्यसन
आणि त्यामुळे कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. विषवVल्ली तंबाखू समाजातून हद्दपार करायची असेल तर तंबाखूच्या शेतीवर कायमस्वरूपी बंदी घालावी आणि तंबाखूचा समावेश अमली पदार्थांच्या यादीमध्ये करण्यात यावा, अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आल्याची माहिती सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे डॉ. कल्याण गंगवाल यांनी दिली. शालेय अभ्यासक्रमात व्यसनमुक्तीच्या धड्यांचा समावेश केल्यास मुलांवर संस्कार होऊ शकतील, असेही ते म्हणाले.

तरुणांमध्ये तंबाखूसेवनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तंबाखूच्या सातत्यपूर्ण सेवनामुळे तोंडाचा कर्करोग, फुप्फुस, अन्ननलिका तसेच जिभेच्या कर्करोगाचा धोकाही वाढला आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये तंबाखूमुळे कर्करोग झालेल्या एका रुग्णावरील शस्त्रक्रियेचा खर्च चार ते पाच लाख रुपयांच्या घरात जातो. ‘उपचारांपेक्षा प्रतिबंध चांगला’ या नियमानुसार, तंबाखूच्या सेवनावर नियंत्रण आणायचे असेल तर विषवल्ली तंबाखू समाजातून हद्दपार करण्याची गरज आहे. ३१ मे हा ‘जागतिक तंबाखू निषेध दिवस’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने केंद्रीय कृषिमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांकडे दोन मागण्यांबाबत प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. तंबाखूच्या शेतीवर बंदी घालावी आणि तंबाखूला अमली पदार्थांच्या यादीत समाविष्ट करावे, या मागण्या प्रामुख्याने करण्यात आल्या आहेत.
गंगवाल म्हणाले, ‘अफूच्या शेतीवर टप्प्याटप्प्याने बंदी घातल्यामुळे हे व्यसन समाजातून नाहीसे झाले. अशाच प्रकारे, पुढील ५ वर्षांमध्ये तंबाखूच्या शेतीवर टप्प्याटप्प्याने बंदी घातल्यास व्यसनावर नियंत्रण आणता येऊ शकते. यामुळे तंबाखूची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पर्याय शोधता येतील आणि त्यांचे नुकसानही होणार नाही. पुण्यात काळ्या बाजारात दररोज हजारो टन गुटखा दाखल होतो आणि तरुणांपर्यंत पोचतो. गुजरात, कर्नाटक या राज्यांच्या सीमांवरूनही तंबाखू महाराष्ट्रात दाखल होतो. पुडीतले हे सर्वांत विषारी उत्पादन आहे. तंबाखूच्या उत्पादनावर नियंत्रण आणल्यास या प्रकाराला आळा बसू शकेल.
तंबाखूचा समावेश अमली पदार्थांमध्ये करण्याची मागणी करण्यात आली आहे. अमली पदार्थांचे सर्व नियम तंबाखूला लागू झाल्यास तरुण पिढीसमोरील सर्वांत मोठा धोका टाळता येऊ शकतो. गेल्या अनेक वर्षांपासून गुटखा आणि तंबाखूविरोधी मोहीम राबवली जात आहे. मात्र, यासाठी शासनातर्फे ठोस धोरण राबवले जात नाही. कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने तंबाखूविरोधी चळवळीतील योजना केवळ कागदावरच राहिल्या आहेत. कायद्यानुसार, शाळांच्या १०० मीटरच्या परिसरात गुटखा, तंबाखू विक्रीस कायद्यानुसार मनाई करण्यात आली आहे. मात्र, हे नियम धाब्यावर बसवले जातात. व्यसनमुक्तीची लढाई यशस्वी करायची असेल, तर ‘नीती’ आणि ‘भीती’ यांची गरज आहे. सामाजिक कार्यकर्ते आपल्या चळवळीतून नीती राबवत असतात. शासनातर्फे ‘भीती’ अर्थात कायद्याचा वचक निर्माण करण्याची आवश्यकता आहे. तंबाखूविरोधातला हा सर्वंकष लढा असून, यामध्ये जनजागृती आणि प्रत्येकाचा सहभाग यातून मोठा बदल घडून येऊ शकेल
तंबाखूच्या व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणांसाठी व्यसनमुक्तीच्या दृष्टीने प्रयत्न करणे हा खूप महत्त्वाचा टप्पा आहे. शालेय स्तरापासून व्यसनमुक्तीचे धडे अभ्यासक्रमात समाविष्ट केल्यास मुलांवर लहानपणापासून संस्कार होऊ शकतील. आजकाल उच्चभ्रू वर्गामध्ये पालक मुलांना वेळ देऊ शकत नसल्याने ही कसर पैैशांतून भरून काढण्याचा प्रयत्न करतात. मुलांकडे दुर्लक्ष होत असल्याने आणि मुलांच्या हाती पैसा खुळखुळत असल्याने ते सहजपणे व्यसनांच्या आहारी जातात. त्यामुळेच शालेय व महाविद्यालयीन तरुणांमध्ये व्यसनांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मुलांवर बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज आहे. सिगरेट, बिडी, जर्दा, गुटखा, मावा, मशेरी, तंबाखू पावडर, तपकीर अशा पदार्थांच्या व्यसनांपासून त्यांना दूर ठेवण्यासाठी समाजातील सर्व पातळ्यांमधून प्रयत्न झाल्यास व्यसनविरोधी लढाईला लक्षणीय यश मिळू शकेल.

Web Title: Exposure to poisonous tobacco society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.