अल्पवयीन मुलीकडे असं काही प्रेम व्यक्त केलं; ३ वर्ष तुरुंगात जाणं नशिबी आलं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 09:02 PM2021-04-01T21:02:17+5:302021-04-01T21:02:26+5:30
I love you सह हिंदी शायरी लिहिलेली चिठ्ठी ठरली महत्वाचा पुरावा...
पुणे : अश्लिल हावभाव करुन शायरी लिहिलेली व प्रेम व्यक्त करणारा संदेश असलेली चिठ्ठी अल्पवयीन मुलीच्या दिशेने फेकणार्या तरुणाला विशेष जिल्हा न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांनी ३ वर्षे सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
अरुणकुमार भगत (वय २२, रा. तळेगाव दाभाडे) असे शिक्षा झालेल्यांचे नाव आहे. ही घटना मावळ तालुक्यातील सोमाटणे येथे २५ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली होती. ही अल्पवयीन मुलगी घराकडे जात होती. त्यावेळी आरोपीने तिच्याकडे बघून अश्लिल वक्तव्य केले. त्यानंतर त्याने तिच्या दिशेने आय लव यु तसेच हिंदी शायरी व त्याखाली मोबाईल नंबर असलेली चिठ्ठी फेकली.
तळेगाव पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक कुंदा गावडे यांनी या गुन्ह्याचा तपास करुन दोषारोप पत्र दाखल केले होते.
या खटल्यात सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी ५ साक्षीदार तपासले. त्यामध्ये पिडीत मुलीची साक्ष व त्याला पृष्टी देणारी आरोपीने फेकलेली चिठ्ठी हा पुरावा महत्वाचा ठरला. न्यायालयाने पुरावा ग्राह्य धरुन आरोपीला ३ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस हवालदार नितीन पवार यांनी सहाय्य केले.