नोटाबंदीवर कलाकृतीतून तरुणाई व्यक्त
By admin | Published: January 13, 2017 03:36 AM2017-01-13T03:36:32+5:302017-01-13T03:36:32+5:30
नोटाबंदीचा काश्मिरी जनतेवर पडलेला फरक, आयुष्यात पैसा कितीही महत्त्वाचा असला
पुणे : नोटाबंदीचा काश्मिरी जनतेवर पडलेला फरक, आयुष्यात पैसा कितीही महत्त्वाचा असला तरी पैशापेक्षा शांततेला असलेलं महत्त्व, नोटाबंदीनंतर नागरिकांना नवीन चलनाचे पडलेले कोडे या सर्व विषयांना स्पर्श करत विविध इन्स्टॉलेशनच्या माध्यमातून तरुणाईच्या सर्जनशील अभिव्यक्तीचं दर्शन ‘पुणे बिनाले महोत्सवा’त पाहायला मिळत आहे.
नोटाबंदीवर समाजाच्या विविध स्तरातून मतप्रदर्शन होत असताना या निर्णयावर इन्स्टॉलेशन्सच्या माध्यमातून तरुण अभिव्यक्त होत आहेत. हा महोत्सव म्हणजे तरुणांना त्यांच्या पद्धतीने अभिव्यक्त होण्याचे माध्यम म्हणून आता पुढे येत आहे.
पुणे बिनाले महोत्सवात विविध देशातील कलाकार कला सादर करत आहेत. कोरेगाव पार्क येथील मोनालिसा कलाग्राम येथे भारतातील ९ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ४५ कलाकृती व इन्स्टॉलेशन नागरिकांना २९ जानेवारी पर्यंत पाहता येणार आहे. या इन्स्टॉलेशनची थिम स्वत:ची ओळख आणि स्वत: अशी आहे. (प्रतिनिधी)