‘नोटा’मधून व्यक्त झाली नाराजी
By admin | Published: February 24, 2017 03:52 AM2017-02-24T03:52:06+5:302017-02-24T03:52:06+5:30
महानगरपालिका निवडणुकीमध्ये बहुतांश उमेदवारांमध्ये ‘काटे की टक्कर’ पहायला मिळाली. पक्ष, व्यक्ती, विकासकामे
पुणे : महानगरपालिका निवडणुकीमध्ये बहुतांश उमेदवारांमध्ये ‘काटे की टक्कर’ पहायला मिळाली. पक्ष, व्यक्ती, विकासकामे आदी निकषांवर मतदारांनी उमेदवारांच्या पारड्यात मते टाकली. मात्र, दुसरीकडे एकही उमेदवार योग्य न वाटल्याने हजारो नागरिकांनी ‘नोटा’ अर्थात नकाराधिकार वापरला. पुण्यात नोटाचा सर्वाधिक वापर आरक्षित जागांवरील उमेदवारांच्या विरोधात झाल्याचे दिसून आले. पुणे विद्यापीठ-वाकडेवाडी या परिसरात (प्रभाग क्र.१०) मध्ये सर्वाधिक ७२९८ मतदारांनी ‘नोटा’चा वापर केला.
लोकप्रतिनिधीची निवड करताना मतदार त्याची शैक्षणिक अर्हता, लोकानुनय, कामांची गती आदी बाबींचा विचार करतात. त्यानुसार उजव्या उमेदवाराला कौल दिला जातो. मात्र, कोणताही उमेदवार लोकनेता होण्याच्या पात्रतेचा नाही, असे वाटल्यास नागरिकांना नोटाचा पर्याय वापरता येतो. त्याप्रमाणे, महानगरपालिका निवडणुकीत हजारो मतदारांनी ‘नोटा’ वापरल्याने उमेदवारांच्या मतांच्या आकडेवारीमध्ये मोठा फरक पडला. या पर्यायामुळे अनेकांची मतांची समीकरणे बिघडली.
कसबा पेठ-सोमवार पेठ, प्रभाग क्र. १६ मध्ये ६१२२, तर प्रभाग क्र. १४ मॉडेल कॉलनी-डेक्कन जिमखाना परिसरात ७५९५ मतदारांनी नकाराधिकार वापरला. घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयात एकूण १४०१५ नागरिकांनी ‘नोटा’ वापरला. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत १८,१९,२० या प्रभागांमध्ये १०,५५९ नागरिकांना नकाराधिकार वापरला.
निवडणुकीला उभे असलेल्यांपैकी कोणताच उमेदवार मला पसंत नसल्याने मी सर्व उमेदवारांना नाकारत आहे, असे मत व्यक्त करण्याची सोय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाने भारतीय मतदारांना उपलब्ध करून दिली. आपले मत काहीही असले तरी ते व्यक्त करण्याचा अधिकार भारतीय नागरिकांना घटनेनेच दिला आहे. त्यामुळे उपलब्ध उमेदवारांपैकी एकही उमेदवार मला हवा तसा नाही, असे मत व्यक्त करण्याचाही त्याला अधिकार आहे. याच अधिकाराचा पुणे महानगरपालिका निवडणुकीत मतदारांनी मोठ्या प्रमाणात वापर केला.
घोलेरोड क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभागात सर्वाधिक वापर
घोले रोड क्षेत्रीय कार्यालयातील ७, १४ आणि १६ या तीन प्रभागांत मिळून तब्बल १४ हजार १५ मतदारांनी नोटाचा वापर केला़ विशेष म्हणजे, या प्रभागातील अनुसूचित जाती महिला आरक्षित जागेवर सर्वाधिक नोटाचा वापर केला गेला आहे़ प्रभाग १६ मधील अ गटात अनुसूचित जाती महिला या गटासाठी तब्बल ३ हजार ३०८ मतदारांनी कोणत्याही उमेदवाराला मत न देता नोटाचा वापर केला़
प्रभाग क्रमांक ७ ब (अनुसूचित जाती महिला)मध्ये ३ हजार ७८ मतदारांनी नोटाचा वापर केला, तर १४ अ (अनुसूचित जाती महिला) २ हजार ७७८ मतदारांनी नोटाचा वापर केला़ १४ ब (मागासवर्ग महिला) मध्ये २ हजार १७६ मतदारांनी नोटाचा वापर केला़ १४ क (सर्वसाधारण महिला) मध्ये १ हजार ८५६ मतदारांनी नोटाचा आधार घेतला़
प्रभाग १९मध्ये नोटा या पर्यायाचा वापर जास्त प्रमाणात झाला. प्रभाग क्रमांक २० मध्ये तर प्रत्येक गटात १ हजारपेक्षा जास्त मते नोटा म्हणून देण्यात आली. या तिन्ही प्रभागात नोटा मतांची संख्या तब्बल १० हजार ५५९ इतकी आहे.