सभापती दमयंती जाधव व श्रीधर किंद्रे यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:09 AM2021-04-18T04:09:37+5:302021-04-18T04:09:37+5:30

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी शनिवार ( दि. १७ ) रोजी इंदापूर येथे ...

Expulsion of Speaker Damayanti Jadhav and Shridhar Kindre from NCP | सभापती दमयंती जाधव व श्रीधर किंद्रे यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी

सभापती दमयंती जाधव व श्रीधर किंद्रे यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी

Next

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी शनिवार ( दि. १७ ) रोजी इंदापूर येथे प्रसिद्ध पत्रकाद्वारे माध्यमांना माहिती दिली. दोन्ही सदस्यांना पक्षाच्या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले होते. परंतु सदर बैठकीस हे दोघेही अनुपस्थित होते. सदर बैठकीमध्ये भोर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुखांनी एकमेव मागणी अर्ज केलेले पंचायत समिती सदस्य लहू शेलार यांचे नाव सभापतिपदासाठी निश्चित केले होते.

त्याप्रमाणे लहू शेलार यांच्या नावे पक्षाचा व्हीप तयार करुन ( दि. १८ ) फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पंचायत समिती सदस्यांना तालुका अध्यक्ष घोरपडे यांनी बजावला. त्यावर सर्व सदस्यांनी व्हीप स्वीकारल्याच्या सह्या केल्या.

भोर पंचायत समितीमध्ये ६ सदस्यांपैकी ४ सदस्य राष्ट्रवादी, १ सदस्य काँग्रेस व १ सदस्य शिवसेना असे पक्षीय बलाबल असताना प्रत्यक्ष सभापती निवडीच्यावेळी दमयंती जाधव यांनी पक्ष आदेशाच्या विरुद्ध जाऊन बंडखोरी करत सभापतिपदासाठी अर्ज भरला आणि त्यांना सूचक म्हणून श्रीधर किंद्रे यांनी पाठिंबा दिला. ऐनवेळी घडलेल्या या प्रकारामुळे सभापतिपदाचे पक्षाचे अधिकृत उमेदवार लहू शेलार व श्रीमती मंगलाताई बोडके यांनी पक्षाची प्रतिमा खराब होऊ नये म्हणून नाईलाजास्तव दमयंती जाधव यांना मतदान केले.

या चारही सदस्यांना झालेल्या प्रकाराबद्दल खुलासा मागितला असता सभापती दमयंती जाधव व माजी सभापती श्रीधर किंद्रे यांचा खुलासा योग्य व समाधानकारक वाटला नाही. त्याचप्रमाणे त्यांनी केलेली ही कृती पक्षाच्या हितास बाधा पोहोचविणारी आणि पक्षशिस्तीचा भंग करणारी आहे. या कारणास्तव दमयंती जाधव व श्रीधर किंद्रे या दोघांची पक्षातून हकालपट्टी करीत आहोत. असे गारटकर यांनी प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.

यापुढे वरील दोन्ही सदस्यांशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी राजकीय संबंध ठेवू नयेत, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली आहे.

Web Title: Expulsion of Speaker Damayanti Jadhav and Shridhar Kindre from NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.