एका विश्वस्तासह तीन उपाध्यक्षांची हकालपट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:09 AM2021-07-22T04:09:24+5:302021-07-22T04:09:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारिणी किंवा अध्यक्षपदामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. परंतु, परिषदेशी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारिणी किंवा अध्यक्षपदामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. परंतु, परिषदेशी वर्षानुवर्षे नाळ जुळलेल्या आणि परिषदेच्या अडीअडचणीत धावून येणा-या एका विश्वस्ताची आणि तीन उपाध्यक्षांची कोणतीही पूर्वसूचना न देता हकालपट्टी केल्याने त्यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
परिषदेच्या कार्यकारी मंडळाची आॅनलाइन सभा नुकतीच पार पडली. त्यात परिषदेच्या काही विश्वस्तांची नव्याने निवड करीत जुन्या विश्वस्ताला कोणतीही पूर्वसूचना न देता काढून टाकण्यात आले. त्यात तीन उपाध्यक्षांचीही अशाच प्रकारे हकालपट्टी करण्यात आली. त्यात परिषदेमध्ये अनेक वर्षे सक्रीय असलेले संत वाड्मयाचे अभ्यासक, माजी आमदार उल्हास पवार यांच्यासह ज्येष्ठ साहित्यिक तारा भवाळकर, चंद्रकांत शेवाळे आणि निर्मला ठोकळ यांना उपाध्यक्षपदावरून डिच्चू देण्यात आला आहे. परिषदेने कार्यकारिणीला कोणताही धक्का न लावता ती तशीच कार्यरत ठेवली आहे. केवळ मनमानीपणे काहीच व्यक्तींची सोयीनुसार हकालपट्टी केल्यामुळे त्यांच्यात नाराजी आहे. कार्यकारी मंडळाला पाच वर्षे मुदतवाढीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसताना परिषदेने हे केलेले बदल अनेकांच्या भुवया उंचावणारे ठरले आहेत. दरम्यान, कार्यकारिणी मंडळाने अत्यंत विचारपूर्वक काही व्यक्तींची नियुक्ती केली आहे. भविष्यात कार्याध्यक्षपदाला आव्हान उभे राहू नये म्हणून राजीव बर्वे यांची उपाध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली असल्याची चर्चा साहित्य वर्तुळात ऐकायला मिळत आहे. कोरोना काळात परिषदेचेअनुदान कमी झाले आहे. त्यामुळे निधी संकलित करणे अवघड झाले आहे. त्यामुळे विश्वस्तपदावर प्रतिष्ठित व्यक्तींची निवड करून परिषदेने हित साधल्याची चर्चाही सुरू आहे.
------------------------------------
आम्हाला केवळ पत्र पाठविली की आपली मुदत संपली आहे. मग तशी मुदत ही कार्यकारी मंडळाची देखील संपली आहे. मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता आम्हाला काढून टाकण्यात आले. जे मला खटकले आहे. ही गोष्ट मला वृत्तपत्रातून कळली. परिषदेने वेळोवेळी अडचणीत सापडली की मला बोलावले. पण विश्वस्तपदावरून काढताना विचार केला नाही. - उल्हास पवार, माजी विश्वस्त
---------------------------------------------
आम्हाला काढायचे होते तर सांगायचे ना? आम्ही स्वत:हून राजीनामे दिले असते. परिषदेच्या कार्यकारी मंडळाने जे केले ते योग्य केले नाही. बदलायची तर पूर्ण कार्यकारिणी बदलायची ना? काही लोक काढून काही लोक सोयीनुुसार ठेवले. ही मनमानी झाली. त्यापेक्षा मग निवडणूक घ्यायची ना? जे चाललं आहे ते ठीक चालले नाही. - चंद्रकांत शेवाळे, माजी उपाध्यक्ष
--------------------------------------