प्रधानमंत्री जनआरोग्य योजना गरीबांपर्यंत पोहोचवा: रामदास आठवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 04:51 PM2018-09-24T16:51:05+5:302018-09-24T16:57:46+5:30
केंद्राच्या आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमुळे राज्यातील ८३ लाख ७२ हजार कुटुंबांना मोफत उपचाराचा लाभ मिळणार असल्याचेही आठवले यांनी स्पष्ट केले.
पुणे: केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा लाभ गरीब जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत,असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.तसेच केंद्राच्या या योजनेमुळे राज्यातील ८३ लाख ७२ हजार कुटुंबांना मोफत उपचाराचा लाभ मिळणार असल्याचेही आठवले यांनी स्पष्ट केले.
आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या निवडक लाभार्थ्यांना आठवले आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते ई-कार्ड चे वाटप करण्यात आले. त्यावेळी आठवले बोलत होते. कार्यक्रमास खासदार अनिल शिरोळे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुण्याचे उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे,आरोग्य उपसंचालक डॉ. नितीन बिलोलीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, डॉ. अमोल म्हस्के आदी उपस्थित होते.
आठवले म्हणाले, औषध आणि पैशांअभावी एखाद्याचा मृत्यू होऊ नये, यासाठी ही योजना महत्त्वाची आहे. गरीबांच्या भल्यासाठी शासनाने ही योजना सुरू केली असून आपण सर्वांनी गरीबांना या योजनेचा फायदा मिळवून द्यायचा प्रयत्न केला पाहिजे. शासनातर्फे आयुष्यमान भारत योजनेसोबतच राज्य शासनाची महात्मा फुले जनआरोग्य योजना एकत्रितपणे राबविण्यात येणार आहे.
गिरीश बापट यांनी गरीब आणि सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून शासनाने ही योजना सुरू केली असल्याचे नमूद केले.प्रधानमंत्री जनआरोग्य योजना यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधितांनी एकदिलाने काम करावे, हे एक मिशन आहे,असे समजून काम करावे,असे आवाहनही बापट यांनी केले.
प्रास्ताविक करताना जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, शासनातर्फे २०११ मध्ये करण्यात आलेल्या सामाजिक, आर्थिक आणि जातनिहाय जनगणनेतील आकडेवारीनुसार ८३ लाख ७२ हजार लाख कुटुंबांची निवड आयुष्मान योजनेसाठी करण्यात आली आहे. त्यांना दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत मिळणार आहेत. पुणे जिल्ह्यात ४ लाख ५७ हजार २८ कुटुंबांना त्याचा लाभ मिळेल. त्यात शहरातील २ लाख ७७ हजार ६३३ तर ग्रामीण भागातील १ लाख ७९ हजार ३९५ कुटुंबांचा समावेश आहे.
डॉ. नांदापूरकर यांनी सध्या पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारकांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना राबविली जात असून या योजनेच्या माध्यमातून ९७१ प्रकारचे उपचार, १२१ शस्त्रक्रिया पश्चात सेवा देण्यात येत असल्याचे सांगितले.
-------------------------