कंत्राटी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:10 AM2021-03-10T04:10:43+5:302021-03-10T04:10:43+5:30
पुणे : कोरोनाच्या काळात ४५ दिवसांकरिता एकवट मानधनावर घेण्यात आलेल्या वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना लसीकरण मोहीम आणि वाढत्या रुग्णसंख्येच्या अनुषंगाने सहा ...
पुणे : कोरोनाच्या काळात ४५ दिवसांकरिता एकवट मानधनावर घेण्यात आलेल्या वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना लसीकरण मोहीम आणि वाढत्या रुग्णसंख्येच्या अनुषंगाने सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
कोरोनाच्या उपाययोजना करताना पालिकेचे मनुष्यबळ कमी पडत होते. कोविड सेंटर, विलगिकरण कक्ष, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, स्वॅब तपासणी आदी कामांसाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता होती. त्यामुळे पालिकेने ४५ दिवसांकरीता एकवट मानधन तत्वावर आरोग्य निरीक्षक, दवाखाना सहायक, हिवताप निरीक्षक,
आया, औषध निर्माता, परिचारक, परिचालिका, कक्षसेवक, सर्व प्रयोगशाळा सहायक कंत्राटी पद्धतीने घेण्यात आले होते. हे सर्व कर्मचारी कोविड योद्धे म्हणून आरोग्य विभागाच्या कोविड सेंटर, स्वॅब सेंटर, दवाखान्यात सेवा करीत आहेत. कोरोना साथीच्या काळामध्ये हे कर्मचारी जीव धोक्यात घालून प्रामाणिकपणे कार्य करत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे पुन्हा गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने आगामी काळात मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे.
शासनाच्यावतीने कोरोना प्रतिबंधित लसीकरण सुरू झाले आहे. या लसीकरणासाठीही या मनुष्यबळाची गरज भासणार आहे. त्यामुळे या सेवकांना ४५ दिवसांकरीता मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी स्थायी समितीला दिला होता. येत्या काही दिवसांत या कर्मचाऱ्यांचा मुदतवाढ कालावधी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची निकड लक्षात घेता या सर्व कर्मचा-यांना ६ महिन्यांकरीता एकवट मानधन तत्वावर मुदतवाढ देण्यात आली आहे.