अभियांत्रिकी प्रवेशासाठी मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 05:24 AM2017-07-20T05:24:31+5:302017-07-20T05:24:31+5:30
राज्यात प्रथम वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या जागा तिसऱ्या फेरीनंतरही रिक्त राहणार असल्याने तंत्र शिक्षण संचालनालयाकडून अतिरिक्त
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यात प्रथम वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या जागा तिसऱ्या फेरीनंतरही रिक्त राहणार असल्याने तंत्र शिक्षण संचालनालयाकडून अतिरिक्त कॅप फेरी राबविली जाणार आहे. ही प्रक्रिया बुधवार (दि.१९) पासून सुरू झाली असून, गुरुवारी (दि.२०) आॅनलाइन अर्ज भरण्याची अखेरची मुदत आहे. राज्य सीईटी कक्षामार्फत प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. या प्रक्रियेची कॅपची (केंद्रीय प्रवेशप्रक्रिया) तिसरी फेरी सध्या सुरू आहे; मात्र प्रवेश क्षमता आणि या टप्प्यात आलेल्या अर्जांच्या संख्येचा विचार करता हजारो जागा रिक्त राहणार आहे. तिसरी फेरी पूर्ण झाल्यानंतरही जागा रिक्त राहण्याची शक्यता लक्षात घेऊन कक्षामार्फत प्रवेशाची अतिरिक्त फेरी राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बुधवारपासून (दि. १९) ही प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेत सुरुवातीला केवळ तीन कॅप फेऱ्या होतील, असे स्पष्ट करण्यात आले होते; पण रिक्त जागांची स्थिती पाहून ही अतिरिक्त चौथी फेरीही घेतली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
विविध कारणांमुळे आॅनलाइन प्रक्रियेत सहभागी न झालेले विद्यार्थी, कागदपत्र पडताळणीमध्ये अपात्र ठरलेले, तसेच विविध कारणांमुळे अंतिम गुणवत्ता यादीत स्थान न मिळालेल्या विद्यार्थ्यांना या टप्प्यात नव्याने अर्ज करता येणार आहेत. दि. २० जुलै रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत आॅनलाइन अर्ज करता येतील.
याच कालावधीत सुविधा केंद्रांवर कागदपत्रांची पडताळणी व अर्ज निश्चित करावा लागणार आहे. त्यानुसार रात्री आठ वाजता अतिरिक्त गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. दि. २२ जुलैपर्यंत पसंतीक्रम भरावे लागतील. त्याआधारे २४ जुलैला निवड यादी जाहीर केली जाईल. या विद्यार्थ्यांना नियमित तिसऱ्या फेरीनंतर रिक्त राहणाऱ्या जागांवर प्रवेश दिला जाईल.