PMC Job | पुणे महापालिकेतील नोकरभरतीसाठी १३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 10:22 AM2023-03-29T10:22:18+5:302023-03-29T10:24:20+5:30
राज्य शासनाच्या आदेशानुसार नोकरभरतीसाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविणारी पुणे महापालिका राज्यातील पहिली महापालिका...
पुणे : महापालिकेतील दुसऱ्या टप्प्यातील ४४५ जागांसाठी राबविण्यात येणाऱ्या नोकरभरतीप्रक्रियेला पंधरा दिवसांची म्हणजेच दि. १३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी दिली.
महापालिकेने ऑक्टोबर २०२२ मध्ये ४४८ जागांसाठी पहिल्या टप्प्यात भरतीप्रक्रिया राबविण्यात आली होती. आयबीपीएस या संस्थेशी करार करून ही भरतीप्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविली गेली. राज्य शासनाच्या आदेशानुसार नोकरभरतीसाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविणारी पुणे महापालिका राज्यातील पहिली महापालिका ठरली. पहिल्या टप्प्यातील भरतीप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ४४५ जागांसाठी भरतीप्रक्रिया राबविली जात आहे. परंतु, पहिल्या टप्प्याच्या तुलनेत दुसऱ्या टप्प्यात भरती प्रक्रियेसाठी कमी प्रतिसाद मिळाला आहे. अर्ज भरण्यास सुरुवात झाल्यापासून पहिल्या १८ दिवसांत केवळ ४ हजार २१८ अर्ज आले होते. यापैकी ३ हजार ७७५ अर्ज पात्र ठरले. दुसऱ्या टप्प्यातील नोकरभरतीसाठी अर्ज करण्याची मुदत दि. २८ मार्च होती. परंतु भरतीप्रक्रियेला कमी प्रतिसाद लक्षात घेता अर्ज भरण्यासाठी आणखी १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
महापालिकेतर्फे या टप्प्यात 'वर्ग १', 'वर्ग २' आणि 'वर्ग ३' मधील रिक्त पदांसाठी सरळ सेवा प्रवेशाने भरती केली जाणार असून, या भरतीमध्ये आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन विभागातील पदे भरण्यात येणार आहेत.