PMC Election | मतदार यादीवर हरकती व सूचना मांडण्यास मुदतवाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 12:02 PM2022-06-30T12:02:30+5:302022-06-30T12:05:02+5:30
नागरिकांना ३ जुलैपर्यंत हरकती व सूचना सादर करता येणार..
पुणे : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी ५८ प्रभागांच्या प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचना सादर करण्यासाठी दोन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना ३ जुलैपर्यंत हरकती व सूचना सादर करता येणार असून, रविवारी सुट्टीच्या दिवशीही पंधरा क्षेत्रीय कार्यालय व सावकर भवन येथील निवडणूक कार्यालय याकरिता सुरू राहणार आहेत.
महापालिका निवडणुकीसाठी नुकतीच प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी जाहीर करण्यात आली होती. निवडणूक प्रक्रियेप्रमाणे या मतदार याद्यांवर हरकती आणि सूचना नोंदविण्यासाठी १ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली होती; मात्र ही मुदत वाढवून मिळावी अशी मागणी विविध पक्षांकडून तसेच नागरिकांकडून, इच्छुकांकडून केली जात होती. या मागणीची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने ही मुदत ३ जुलैपर्यंत वाढविली आहे. त्यानुसार मतदार यादीवर हरकती आणि सूचना नोंदविण्यासाठी मतदारांना अधिक वेळ मिळणार आहे. हरकती आणि सूचनांवर सुनावणी घेतल्यानंतर अंतिम मतदार यादी पूर्वघोषित नियोजनानुसार ९ जुलै रोजीच जाहीर केली जाणार आहे.
प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांमध्ये आपले नाव आहे किंवा नाही. तसेच ते योग्य यादीत आहे किंवा नाही, याची तपासणी नागरिकांनाही करता येणार आहे. ही सुविधा ट्रु-व्होटर मोबाइल ॲपवर उपलब्ध आहे.
* अशी असेल सुविधा
* ॲपमध्ये प्रारूप मतदार यादीमध्ये नाव शोधणे, वॉर्डनिहाय यादी डाऊनलोड करता येणार
* आपल्या मतदार यादीतील पत्त्याप्रमाणे आपले नाव कोणत्या वाॅर्डात आहे ते बघून त्यात कोठे काही चुकीचे आढळल्यास त्यावर दिलेल्या मुदतीमध्ये आक्षेप नोंदविता येणार.
* फायनल मतदार यादी ट्रु व्होटर ॲपमध्ये बघण्याची सुविधा
* बुथनिहाय मतदार यादी बघण्याची सुविधा, बुथ लोकेशनला जाण्याकरिता नेव्हिगेशनची सुविधा
* उमेदवारांची अंतिम यादी तयार झाल्यावर सर्व उमेदवारांचे केवायसी डिटेल्स बघण्याची सुविधा
* सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणूक निकाल बघण्याची सुविधा.