पुणेकरांना सवलतीने मिळकतकर भरण्यासाठी मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत भरता येणार कर
By निलेश राऊत | Published: May 30, 2024 07:55 PM2024-05-30T19:55:25+5:302024-05-30T19:56:26+5:30
गेल्या काही दिवसांपासून हे संकेतस्थळ खोलल्यावर अंडर कंट्रक्शन असाच मेसेज येत आहे. त्यामुळे नागरिकांकडून सवलतीसह मिळकतकर भरण्यासाठी वारंवार मागणी केली जात होती...
पुणे : शहरातील मिळकतधारकांना महापालिकेच्या मिळकतकर विभागाच्या संकेतस्थळावरील तांत्रिक अडचणीमुळे कर भरता येत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सवलतीने कर भरणाऱ्या मिळकतधारकांना अधिकचा वेळ मिळावा, यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
महापालिकेचे आयुक्त डॉ.राजेद्र भोसले यांनी याबाबत माहिती दिली. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा मिळकत कर ५ ते १० टक्के सवलतीने भरण्यासाठी दरवर्षी प्रमाणे यंदाही १ एप्रिल ते ३१ मे या दोन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. पण अनेक मिळकतधारकांना वेळेवर पोस्टाने बिले न मिळाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. तसेच महापािलकेच्या मिळकत कर विभागाने propertytax.punecorparation.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेले बिले ही संकेतस्थळावरील तांत्रिक अडचणीमुळे गेली काही दिवस उपलब्ध होऊ शकली नाहीत.
गेल्या काही दिवसांपासून हे संकेतस्थळ खोलल्यावर अंडर कंट्रक्शन असाच मेसेज येत आहे. त्यामुळे नागरिकांकडून सवलतीसह मिळकतकर भरण्यासाठी वारंवार मागणी केली जात होती. त्यामुळे मिळकतधारकांना सवलतीसह ऑनलाईन पध्दतीने कर भरता यावा व संकेतस्थळावर मिळकतकराची बिले डाऊनलोड करता यावीत, यासाठी १५ जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. महापालिकेच्या सर्व नागरी सुविधा केंद्र शनिवार रविवार तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत मिळकत कर भरणा करण्यासाठी खुली राहणार आहेत.
मिळकत करासंदर्भात कोणत्याही समस्येसाठी १८०० १०३० २२२ या टोल फ्री क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन कर आकारणी व कर संकलन विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी केले आहे.