विद्यार्थ्यांना जातपडताळणीसाठी दीड महिन्यांची मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 01:42 PM2018-06-30T13:42:36+5:302018-06-30T13:53:55+5:30
राज्यातील विविध व्यावसायिक अभ्याक्रमांच्या कोर्सेससाठी जात प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे...
पुणे : राज्यातील अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चर, एमबीए, हॉटेल मॅनेजमेंट, डिप्लोमासह व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे. यामुळे हजारो विद्यार्थी अडचणीत आले होते. यापार्श्वभूमीवर जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी शासनाने दीड महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.
बीई व बीटेक, बीफार्मसी व डी. फार्मसी, आर्किटेक्चर पदवी, पदवीस्तरावरील हॉटेल मॅनेजमेंट अॅँड केटरिंग टेक्नॉलॉजी, एमबीए व एमएमएस आदी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी १० आॅगस्ट पर्यंत, एमसीए १९ आॅगस्ट, एसएससी डिप्लोमा २५ आॅगस्ट, एचएचसी डिप्लोमा २६ आॅगस्ट, थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा २३ आॅगस्ट पर्यंत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशामुळे प्रवेशाच्यावेळीच जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची सक्ती करण्यात आलेली आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशावेळी जात वैधता प्रमाणपत्र (कास्ट व्हॅलिडिटी) बंधनकारक करण्यात आल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. अनेक विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र मिळाले नसल्याने त्यांचे शिक्षण अडचणीत सापडले आहे. यापार्श्वभूमीवर नॅशनल स्टूडुन्ट युनियन आॅफ इंडियासह अनेक संघटनांनी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्याच धर्तीवर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मुदतवाढ देण्याचे आदेश काढले आहेत.
राज्य सीईटी सेलने जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अभ्यासक्रमनिहाय वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्याप्रमाणे व्यावसायिक अभ्यासक्रम संस्थांच्या निदर्शनास आणून द्यावेत, असेही सेलने तंत्रशिक्षण संचालनालयास कळविले आहे. त्यानुसार कार्यवाही करावी असे तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांनी स्पष्ट केले आहे.
.