शिष्यवृत्ती अर्जासाठी मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:11 AM2021-04-25T04:11:23+5:302021-04-25T04:11:23+5:30
पुणे : समाज कल्याण विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास येत्या ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ...
पुणे : समाज कल्याण विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास येत्या ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून विविध स्तरावर प्रलंबित असलेले अर्ज समाज कल्याण विभागाकडे पाठवता येणार आहेत. तसेच यानंतर अर्जासाठी मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे उच्च शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे.
महाविद्यालयांमध्ये विविध अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क, राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, निर्वाह भत्ता या योजना राबविल्या जातात. विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलवरून या शिष्यवृत्ती योजनांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतो. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी भरल्या जाणाऱ्या अर्जांपैकी अनेक अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शिष्यवृत्ती अर्जासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवरील प्रोफाईलवर लॉगइन करून आपल्या अर्जाची स्थिती तपासावी,आधार खाते बँक अकाऊंटशी संलग्न नसल्यास ते संलग्न करावे, अशा सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत.