परीक्षेसंदर्भातील तक्रारीसाठी मुदतवाढ द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:12 AM2021-04-23T04:12:07+5:302021-04-23T04:12:07+5:30
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे प्रथम सत्राच्या ऑनलाईन परीक्षा घेतल्या जात असून, गुरुवारी तब्बल १ लाख २१ हजार ...
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे प्रथम सत्राच्या ऑनलाईन परीक्षा घेतल्या जात असून, गुरुवारी तब्बल १ लाख २१ हजार ६९८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. दरम्यान, विद्यापीठाने परिपत्रकात स्पष्ट केलेल्या माहितीनुसार ४८ तासांत परीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार होता. मात्र, काही विषयांचा निकाल वेळेत प्रसिद्ध होऊ शकला नाही. त्यामुळे संबंधित विषयांबाबतच्या तक्रारीसाठी विद्यापीठाने मुदतवाढ द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.
विद्यापीठातर्फे पुणे, अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यांमधील संलग्न महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जात आहे. गुरुवारी १ लाख २६ हजार ३०४ चार विद्यार्थी ९८ विषयांच्या परीक्षा देणार होते. मात्र ९६.३५ टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. सकाळच्या सत्रात सुमारे ५५ हजार, दुपारच्या सत्रात ४६ हजार तर सायंकाळच्या सत्रात २१ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, असे विद्यापीठातर्फे कळविण्यात आले आहे.
विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षांचा निकाल विद्यार्थ्यांना ४८ तासांत पाहता येऊ शकतो, अशी यंत्रणा विद्यापीठाने उभी केली होती. मात्र, एकाच वेळी लाखो विद्यार्थ्यांनी संबंधित संकेतस्थळाला भेट दिल्याने सर्वर डाऊन झाला. परिणामी दोन ते तीन दिवस विद्यार्थ्यांना संबंधित विषयांचे गुण पाहता येऊ शकले नाही. या विषयासंदर्भातील तक्रार करण्यास विद्यापीठाने मुदतवाढ द्यावी, अशी मागणी काही विद्यार्थी संघटनांनी केले आहे.