आपत्कालीन बटन बसविण्याला वर्षभर मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 07:01 PM2018-04-23T19:01:17+5:302018-04-23T19:01:17+5:30
केंद्रीय मोटार वाहन नियम कायद्यात करण्यात आलेल्या बदलानुसार दि. १ एप्रिल २०१८ पासून सर्व सार्वजनिक सेवा वाहनांनी लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस व इमर्जन्सी बटन बसविणे बंधनकारक करण्यात आले होते.
आपत्कालीन बटन बसविण्याला मुदतवाढ
पुणे : प्रवासी वाहतुक करणाऱ्या वाहनांमध्ये आपत्कालीन बटन (इमर्जन्सी) तसेच वाहनाचा मागोवा घेणारे उपकरण (लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस) बसविण्याचा निर्णय वर्षभर पुढे ढकलण्यात आला आहे. आता या निर्णयाची अंमलबजावणी दि. १ एप्रिल २०१९ पासून केली जाणार असल्याची अधिसुचना काढण्यात आली आहे.
केंद्रीय मोटार वाहन नियम कायद्यात करण्यात आलेल्या बदलानुसार दि. १ एप्रिल २०१८ पासून सर्व सार्वजनिक सेवा वाहनांनी लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस व इमर्जन्सी बटन बसविणे बंधनकारक करण्यात आले होते. यामधून दुचाकी वाहने, ई-रिक्षा, तीनचाकी वाहन व ज्या वाहनांना परवाना लागू नाही, अशी वाहने वगळण्यात आली आहेत. तर एसटी, पीएमपीच्या बसेस, खासगी बसेस, टॅक्सी, कॅबला हे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, आता हा निर्णयही वर्षभर पुढे ढकलण्यात आला आहे. रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्रालयाने याबाबत दि. १८ एप्रिल रोजी अधिसुचना काढली आहे. त्यानुसार आता सर्व सार्वजनिक वाहतुक करणाऱ्या वाहनांना दि. १ एप्रिल २०१९ पर्यंत यातून सुट देण्यात आली आहे. त्यामुळे तोपर्यंत लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस व इमर्जन्सी बटन बसविण्यासाठी वेळ मिळणार आहे.