सीईटी-सेलकडून कागदपत्र सादर करण्यास मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:10 AM2021-01-18T04:10:02+5:302021-01-18T04:10:02+5:30
पुणे : राज्याच्या तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे ...
पुणे : राज्याच्या तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी-सेल) राबविली जात आहे. परंतु, जात प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे (र्इडब्ल्यूएस) प्रमाणपत्र नसल्याने काही विद्यार्थी आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना आवश्यक प्रमाणपत्र सादर करण्यासाठी २० जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
सीईटी सेलकडून अभियांत्रिकी, फार्मसी, एमबीए, आर्किटेक्चर, एमटेक, हॉटेल मॅनेजमेंट आदी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. मराठा आरक्षणास स्थगिती आल्यामुळे एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या किंवा ‘ईडब्ल्यूएस’ प्रवर्गातून अर्ज भरावा लागत आहे. तसेच ‘ईडब्ल्यूएस’ प्रवगार्तून प्रवेश मिळण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वेळ लागत आहे. प्रवेश घेताना जात पडताळणी प्रमाणपत्र, एनसीएल मूळ प्रमाणपत्र सदर करणे गरजेचे आहे. परंतु, विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्र काढण्यासाठी केलेल्या अर्जाची पावती जोडून ऑनलाईन प्रवेश नोंदणी प्रक्रियेत सहभाग घेतला आहे. मात्र, मूळ कागदपत्र सादर केल्याशिवाय विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित होत नाही.
आरक्षणाचा लाभ मिळाला नाही तर विद्यार्थ्यांना खुल्या गटातून प्रवेश घ्यावा लागतो. परिणामी पालकांवर आर्थिक भार पडतो. त्यामुळे प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत वाढवावी, अशी मागणी अनेक पालकांकडून केली जात होती. त्यावर सीईटी सेलने परिपत्रक काढून २० जानेवारीपर्यंत मुदत वाढविली आहे. काही अभ्यासक्रमांची पहिली फेरी जाहीर झाली असून काहींची दुसरी फेरी सुरू झालेली आहे. परंतु, आता प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक १८ जानेवारी रोजी प्रसिद्ध केले जाणार असल्याचे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.