गारपिटीने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:07 AM2021-04-29T04:07:09+5:302021-04-29T04:07:09+5:30
मंगळवारी सायंकाळी परिसराला मुसळधार पावसाने चांगलाच तडाखा दिला. अर्धा तास गारपीट झाली. वादळीवारे तसेच मुसळधार पाऊस कोसळला. सुमारे तासभर ...
मंगळवारी सायंकाळी परिसराला मुसळधार पावसाने चांगलाच तडाखा दिला. अर्धा तास गारपीट झाली. वादळीवारे तसेच मुसळधार पाऊस कोसळला. सुमारे तासभर अवकाळी पाऊस पडत होता. या पावसाने शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. विशेषत: गारांच्या तडाख्याने नगदी पिकांचे नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात मेथी, कोथिंबीर या पालेभाज्यांचे पीक कमी प्रमाणात येते. तीव्र उन्हामुळे मेथी व कोथिंबीर या पिकांची मर होत असल्याने शेतकऱ्यांना हे पीक घेण्यासाठी विशेष लक्ष द्यावे लागते. काही शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने मेथी कोथिंबीर पीक घेतले होते. मात्र गारांच्या तडाख्याने पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आगामी काळात मेथी, कोथिंबीर यांचा तुटवडा भासणार आहे. उन्हाळी बाजरीचे पीक या भागात फुलोऱ्यात आले आहे. बाजरी राखण्याचे काम शेतकऱ्यांनी सुरू केले आहे. गारपिटीमुळे आणि पावसाच्या तडाख्याने अनेक शेतातील बाजरीचे पीक भुईसपाट झाले आहे. दरम्यान पावसाचा परिणाम कांदा काढणीवर झाला आहे. आज जमिनीत ओल असल्याने कांदा काढणी बंद होती. ऊस तोडीवरसुद्धा पावसाचा परिणाम झाला आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. जनावरांचा चारा सुद्धा भिजला गेला.
मुसळधार पाऊस व गारांच्या तडाख्याने बाजरी पिकाचे नुकसान झाले आहे.