सीम ब्लाॅक हाेण्याची भीती दाखवून पाच लाखांना गंडा; पुण्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 05:32 PM2022-12-27T17:32:01+5:302022-12-27T17:32:14+5:30
‘तुमचे सीमकार्ड २४ तासांत ब्लॉक होईल’ या मेसेजला प्रतिसाद दिला अन्...
पुणे : सायबर क्राईमपासून सावध राहण्याबाबत बँका, पोलिसांकडून वारंवार सजग राहण्याचे आवाहन केले जात आहे. अनोळखी मोबाईलवरून आलेल्या मेसेजला उत्तर देऊ नका, असे सांगितले जात आहे. तरीही एका प्राध्यापकाने त्यांना आलेल्या ‘तुमचे सीमकार्ड २४ तासांत ब्लॉक होईल’ या मेसेजला प्रतिसाद दिला. त्यातील नंबरवर संपर्क केला. परिणामी सायबर चाेरट्यांनी तब्बल ४ लाख ९० हजार रुपयांना गंडा घातला.
याप्रकरणी सदाशिव पेठेत राहणाऱ्या एका ५३ वर्षांच्या प्राध्यापकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादींच्या मोबाईलवर एक मेसेज आला होता. तुमचे जिओचे सीमकार्ड २४ तासांत ब्लॉक होईल. तुमचे सीम कार्ड व्हेरिफिकेशन बाकी आहे. ते पूर्ण करण्यासाठी संपर्क साधा असे म्हणून संपर्क क्रमांकही दिला. त्यावर संपर्क साधला. तेव्हा तुम्ही जिओ ॲप उघडून १० रुपयांचे रिचार्ज नेट बॅकिंगने करा आणि फोन व्होल्डवर ठेवा, असे सांगितले. प्राध्यापकानेही त्यावर विश्वास ठेवून १० रुपयांचे रिचार्ज केले. फोन बंद न करता होल्डवर ठेवला.
फोन होल्डवर ठेवल्यानंतर त्यांनी बँकेचे लॉगीन केले आणि बँक बॅलेन्स चेक केला. तेव्हा त्यांच्या खात्यात पूर्ण रक्कम होती. त्यामुळे ते फोनवर या व्यक्तीशी बोलत होते. त्यानंतर त्यांना ओटीपी आला. त्यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यामधून ४ लाख ९० हजार रुपये कमी झाले. त्यानंतर त्यांनी मोबाईलवरील बोलणे बंद केले. विश्रामबाग पोलीस अधिक तपास करीत आहेत.