मार्केट यार्डात डुप्लिकेट पुस्तक करून पार्किंग शुल्काच्या नावे लूट; ठेकेदारांची वसुली जोरात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 01:12 PM2024-06-01T13:12:42+5:302024-06-01T13:13:19+5:30
बाजार समितीच्या आवारात पार्किंग केलेल्या गाड्यांना बाजार समितीकडून पार्किंग शुल्क आकारले जात आहे. मात्र, बाजार समितीच्या ठेकेदारांकडून गाड्यांना डुप्लिकेट पावत्या देऊन शुल्क वसूल केले जात आहे...
पुणे :पुणे बाजार समितीमध्ये ठेकेदारांकडून पार्किंगच्या नावाखाली वाहनचालकांची पिळवणूक होत आहे. आता तर डुप्लिकेट पावती पुस्तक तयार करून पार्किंग शुल्क वसुली केली जात असल्याचा प्रकार मार्केट यार्डात समोर आला आहे. त्यामुळे हा प्रकार कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? असा सवाल उपस्थित होत आहे.
बाजार समितीच्या आवारात पार्किंग केलेल्या गाड्यांना बाजार समितीकडून पार्किंग शुल्क आकारले जात आहे. मात्र, बाजार समितीच्या ठेकेदारांकडून गाड्यांना डुप्लिकेट पावत्या देऊन शुल्क वसूल केले जात आहे. त्यामुळे बाजार समितीचा सुरक्षा व अतिक्रमण विभागाचे पितळ उघडे पडले आहे. त्यामुळे बाजार समितीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.
भुसार विभागातील फळे भाजीपाला विभागाच्या गेट क्र. ४ च्या परिसरात अवेरिया एंटरप्रायझेस या ठेकेदाराला ठरवून दिलेल्या जागेव्यतिरिक्त रहदारीच्या अर्ध्या रस्त्यावर ताबा मारत पार्किंग शुल्क वसुली सुरू केल्याचा प्रकार समोर आला होता तसेच पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान ठेकेदाराचे कर्मचारी वाहनांमध्ये झोपलेल्या चालकांना उठवून दमदाटी करत पैसे वसूल करत असल्याचा प्रकार यापूर्वी अनेकदा समोर आला आहे. आता तर बाजार समितीत डुप्लिकेट पावत्याद्वारे पार्किंग शुल्क वसुली सुरू असल्याचा प्रकार समोर आले आहे. आता या प्रकरणात बाजार समिती प्रशासन नेमके काय कारवाई करते? याकडे लक्ष लागले आहे.
मूळ पावती हुबेहूब
डुप्लिकेट पावती क्रमांक ४८३९ या पावतीवर २८ मे रोजी गाडी क्रमांक एमएच १२ क्यूआर ९३१६ या वाहनाला नो पार्किंगच्या नावाखाली ३२० रुपये शुल्क वसुल केल्याचे समोर आले आहे तर १० सप्टेंबर २०२३ रोजी ४८३९ या ओरिजनल पावती क्रमांकाद्वारे मे सेजल ट्रेडिंग कंपनीने ४४ हजार १९ रुपयांचा सेस बाजार समितीकडे भरला आहे.
बाजार समितीची हुबेहूब पावती तयार करून हा प्रकार केल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज तपासून अशा प्रकारे पैसे वसूल करणाऱ्यांची माहिती घेऊन चौकशी करणार आहे. यातील दोषीवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल केला जाईल.
- डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, बाजार समिती, पुणे.