पाणीपुरी विक्रेत्याला मारहाण करून हप्ता मागणाऱ्या तिघांविरोधात खंडणीचा गुन्हा; लोणीतील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 04:22 PM2023-08-29T16:22:14+5:302023-08-29T16:23:02+5:30
एक हजार रुपयांचा हप्ता मागणाऱ्या तिघांविरोधात पारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल...
मंचर (पुणे) : पाणीपुरी विक्रेत्याला मारहाण करत एक हजार रुपयांचा हप्ता मागणाऱ्या तिघांविरोधात पारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार लोणी येथे घडला आहे. मच्छिंद्र लक्ष्मण लष्करे, नितीन नारायण सुक्रे व स्वप्निल बाळू गोरडे (सर्व रा. खडकवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी गावच्या हद्दीत ग्रामपंचायतसमोर रस्त्यालगत फिर्यादी नानुराम दयाराम मेघवाल (मूळ रा. राजस्थान) हा पाणीपुरी विक्रीची गाडी लावतो. मच्छिंद्र लक्ष्मण लष्करे, नितीन नारायण सुक्रे व स्वप्निल बाळू गोरडे या तिघांनी येऊन दीडशे रुपयांची पाणीपुरी खाल्ली. विक्रेता नानुराम मेघवाल याने पैसे मागितले असता तूच आम्हाला येथे पाणीपुरीचा धंदा करायचा असेल तर दर महिन्याला एक हजार रुपयांचा हप्ता द्यायचा. नाही तर तुला या ठिकाणी धंदा करू देणार नाही, असे म्हणून नितीन सुक्रे याने हाताने मारहाण केली.
मच्छिंद्र लष्करे याने गाड्यावरील साहित्य फेकून देऊन नुकसान केले आहे. पाणीपुरी विक्रेत्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी नानुराम दयाराम मेघवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी मच्छिंद्र लक्ष्मण लष्करे, नितीन नारायण सुक्रे व स्वप्निल बाळू गोरडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तीनही आरोपींना अटक करून घोडेगाव न्यायालयात हजर करण्यात आले. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक जठर करत आहेत.