उसने दिलेल्या साडेतीन लाखांच्या बदल्यात १४ लाखांची खंडणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 10:14 AM2023-10-20T10:14:34+5:302023-10-20T10:14:49+5:30

महिलेसह अन्य एकाला अटक, महाराष्ट्र सावकारी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल

Extortion of 14 lakhs in exchange of 3.5 lakhs lent | उसने दिलेल्या साडेतीन लाखांच्या बदल्यात १४ लाखांची खंडणी

उसने दिलेल्या साडेतीन लाखांच्या बदल्यात १४ लाखांची खंडणी

पुणे : पैशांची गरज असल्याने एका महिलेने दोन जणांकडून तीन लाख ७० हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने महिना १६ टक्के व्याजाने उधारीवर घेतले. घेतलेल्या पैशांची परतफेड केल्यानंतरदेखील १४ लाख रुपयांची मागणी करून जबरदस्ती केल्याप्रकरणी एका महिलेसह एका इसमाला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी कविता धीरज अगरवाल (३०, रा. खडकी) यांनी आरोपींविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

ममता विशाल गोयल आणि नीलेश राम बहिरट (३२, रा. बोपखेल) या आरोपींवर पोलिसांनी महाराष्ट्र सावकारी कायदा, तसेच अन्य कलमांनुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार ऑगस्ट २०२२ ते १८ ऑक्टोबर २०२३ पर्यंतच्या काळात घडला आहे. संबंधित आरोपी ममता गोयल आणि नीलेश बहिरट यांच्याकडे सावकारी परवाना नसतानादेखील त्यांनी अगरवाल यांना पैशाची गरज असल्याचे ओळखून वेळोवेळी नीलेश बहिरट यांच्या खात्यावरून ऑनलाइन पद्धतीने तीन लाख ७० हजार रुपये पाठवले. त्या बदल्यात अगरवाल यांनी मुद्दल आणि व्याजापोटी एकूण पाच लाख ४८ हजार रुपये रोख व ऑनलाइन पद्धतीने परतफेड केली. मात्र, अगरवाल यांच्याकडून जादा १४ लाख रुपयांची मागणी करण्यात येत होती. ती वसूल करण्यासाठी आरोपी ममता गोयल हिने अगरवाल यांची कार व सहीचा कोरा बनावट चेक जबरदस्तीने घेऊन जात फोनवरून शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी आरोपींविरोधात संबंधित तक्रार दाखल झाल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.

Web Title: Extortion of 14 lakhs in exchange of 3.5 lakhs lent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.